पुणे : विधान परिषदेसाठी होणाऱ्या पुणे शिक्षक मतदार संघातील मतदार मोजणीची कोटा गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास निश्चित झाला आहे. यामुळे विजयी उमेदवारास एकूण वैध मतांच्या भागीले दोन अधिक एक मते, म्हणजे २५ हजार ११४ मते मिळविणे आवश्यक आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक मतदार संघातील एकूण ५३ हजार १० मते मोजली गेली. यापैकी २ हजार ७८४ मते अवैध ठरली असून, ५० हजार २२६ मते वैध ठरली आहेत. या निवडणुकीत मतमोजणीच्या निकषानुसार पसंती क्रमांकानुसार मतमोजणी होणार असून, पहिल्या पसंती क्रमांक मध्ये एखाद्या उमेदवारास २५ हजार ११४ मते पडल्यास त्यास विजयी घोषित केले जाण्याची शक्यता आहे. मात्र मतांचा हा निश्चित कोटा पूर्ण न झाल्यास दुसऱ्या क्रमांकाची मते मोजली जाणार आहेत. यामुळे पुणे शिक्षक मतदार संघातील निकाल जाहीर होण्यास शुक्रवार दिनांक ४ डिसेंबर रोजीची सकाळ उजडण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीच्या जयंत आसगावकर यांना पहिल्या फेरीत १६ हजार ८७४ मते; विजयासाठी पुढील पसंती क्रमांकाच्या मोजणीची वाट पाहावीच लागणार
पुणे शिक्षक मतदार संघात पहिल्या पसंती क्रमांकाची सर्वाधिक मते पडलेल्या, महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर यांना १६ हजार ८७४ मते पडली आहेत. मात्र विजयी आकडा गाठण्यासाठी आसगावकर यांना पुढील मोजणीची वाट पाहावी लागणार आहे.पुणे शिक्षक मतदार संघात एकूण ३५ उमेदवार रिंगणात असून, पहिल्या पसंती क्रमांकात आसगावकर यांनी आघाडी घेतली आहे. तर प्रमुख प्रती स्पर्धी व भाजपचे पाठिंबा दिलेल्या उमेदवार जितेंद्र पवार यांना ५ हजार ७९५ मते मिळाली आहेत. तर विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांना ११ हजार २४ मते मिळाली आहेत. यामुळे विजयी उमेदवारास २५ हजार ११४ मतांची आवश्यकता आहे.