पुणे : हॉटेल व्यवसायाला औद्योगिक दर्जा देण्याची हॉटेल व्यावसायिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. ती राज्य शासनाने मान्य केली आहे. पुणे विभागातून आतापर्यंत ११७ हॉटेल व्यावसायिकांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे अर्ज केले आहेत. या अर्जाची एका महिन्यात छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देणार असल्याचे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
औद्योगिकचा दर्जा मिळाल्यास हॉटेल व्यावसायिकांना वीजदर, वीजशुल्क, पाणीपट्टी, मालमत्ताकर, विकासकर, वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक तसेच अकृषिक कराची आकारणी यापुढे औद्योगिक दराने होणार आहे.
केंद्राच्या पर्यटन मंत्रालयाकडे नोंदणीकृत नसलेल्या हॉटेल व्यावसायिकांनी किमान मूलभूत दर्जा प्राप्त करण्यासाठी राज्यातील हॉटेल व्यावसायिकांनी नोंदणी करावी, अशी सूचना राज्याच्या पर्यटन मंत्रालयाने केली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शासनाच्या सवलतीकरिता हॉटेल नोंदणी/दर्जा मिळवण्यासाठी संबंधित हॉटेल व्यावसायिकांनी सर्व कागदपत्रांसह www. maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे. पर्यटन उपसंचालक याची पडताळणी करून अंतिम मंजुरीसाठी संचालकांकडे सादर करणार आहेत. संपूर्ण प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण करून नोंदणी प्रमाणपत्र दिले जाणार आहे.