भवानीनगर : पुणे जिल्ह्यातील ७५ गावांमधील ७७३ वाड्या-वस्त्यांना ११७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ऐन पावसाळ्यातदेखील टँकरने सर्वाधिक लोकसंख्येला पाणीपुरवठा होत आहे. जुलै महिनादेखील निम्मा होऊन गेला आहे; मात्र बारामती, दौंड, इंदापूर या तालुक्यांतील टँकरची संख्या कमी झालेली नाही. ११ जुलैपर्यंत जिल्हा परिषदेच्या अहवालानुसार जिल्ह्यात ११७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. बारामती तालुक्यात सध्या सर्वाधिक टँकर सुरू आहेत. तालुक्यातील जिरायती भागात पाण्याबरोबरच चाऱ्याची स्थितीही भीषण आहे. जिल्ह्यात सध्या सर्वाधिक टँकर बारामती तालुक्यात ३३ इतके आहेत. त्यापाठोपाठ इंदापूर तालुक्यात १९, पुरंदर २० आणि दौंड तालुक्यात २८ असे जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी ७ तालुक्यांत टँकर सुरू आहेत. टँकरबरोबर याच जिल्ह्यात खासगी ३५ विहिरी आणि ७ बोअर अधिग्रहण केले आहेत. बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या तालुक्यांत दमदार पाऊस नसल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे टँकरची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. सध्या खडकवासला कालव्याद्वारे इंदापूर आणि दौंड या तालुक्यांत पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे दौंड आणि इंदापूरमधील टँकरची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. दमदार पाऊस झाला तरी बारामती, पुरंदर व दौंड, इंदापूरमधील गावे टँकरमुक्त होणार नाहीत. (वार्ताहर)
११७ टँकरद्वारे पाणीपुरवठा !
By admin | Published: July 16, 2016 1:05 AM