पुणे :पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील अकरावी प्रवेश प्रक्रियेस येत्या सोमवारपासून (दि. २३) सुरुवात होणार असून, विद्यार्थ्यांना २३ ते २७ मे या कालावधीत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे. येत्या 3० मेपासून प्रवेश अर्जाचा पाहिला भाग, तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश अर्जाचा दुसरा भाग प्रत्यक्ष भरता येईल, असे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे पुणे व पिंपरी चिंचवड, मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने दिले जातात. शिक्षण विभागाने ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश अर्ज भरण्याचा सराव करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करावी, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश फेऱ्या व कोट्यांतर्गत फेऱ्यातून प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेशी संपर्क साधावा. तसेच प्रवेशासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे काढून ठेवावी, अशाही सूचना राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिल्या आहेत.