पुणे : पुणे-पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह नाशिक, अमरावती व नागपूर महापालिका क्षेत्रातील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने केले जात असल्याने या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्याप्रमाणे 25 मे पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी आणि अर्जाचा भाग 1 भरता येणार आहे.
राज्यमंडळाचा दहावीचा निकाल लागल्यानंतर प्रवेशाची पहिली फेरी जाहीर होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दुसरी व तिसरी, विशेष 1 व 2 पार पडतील, उर्वरित विद्यार्थ्यांसाठी दैनंदिन गुणवत्ता विशेष फेल्या होतील. प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य फेरी होणार नाही, ऑगस्ट अखेर अकरावी प्रवेश प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी दिली.
काही दिवसांपूर्वीच सीबीएसई, सीआयएससीई आदी मंडळाचे दहावीचे निकाल जाहीर झाले आहेत. लवकरच राज्यमंडळाचे दहावीचे निकाल जाहीर होतील. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची पूर्वतयारी होणे आवश्यक आहे. याकरिता प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी, पालकांना माहिती, मार्गदर्शन मिळण़्यासाठी नियोजन आणि कृती आराखडा तयार करण्याबरोबरच विद्यार्थी-पालकांसाठी उदबोधन वर्ग, शाळा मार्गदर्शन केंद्रासाठी प्रशिक्षण आयोजित करण्याबाबतच्या सूचना विभागीय उपसंचालकांना देण्यात आल्या आहेत.
असे असेल प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
केंद्रिय प्रवेश प्रक्रियेसाठीच्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना दि.20 ते 24 मे दरम्यान ऑनलाईन अर्ज नोंदणी, प्रवेश अर्ज भरण्यासाठी सरावाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 25 मे पासून ऑनलाईन नोंदणी, प्रवेश अर्जाचा भाग 1 भरणे व अर्ज प्रमाणित (व्झेरिफाय) करणे. 20 मे पासून शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत सुरु राहील. अल्पसंख्यांक, व्यवस्थापन, संस्थांतर्गतच्या राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया दहावीच्या निकालानंतर सुरु होईल.