पुणे : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया ठप्प झाली आहे. मात्र घरी बसून कंटाळलेल्या विद्यार्थ्यांसाठी येत्या सोमवारपासून इयत्ता अकरावीचे ऑनलाईन वर्ग सुरू केले जाणार आहेत. या वर्गांसाठी आत्तापर्यंत ६० हजार ३६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
इयत्ता पहिलीपासून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषदेमार्फत सह्याद्री वाहिनीवर विविध शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्यात आले. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे. परंतु, इयत्ता 11 वी च्या विद्यार्थ्यांसाठी मार्च महिन्यापासून कोणताही शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला नाही. अकरावीची प्रवेश प्रक्रिया ठप्प झाल्यामुळे विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. घरी बसून विद्यार्थ्यांना अकरावीच्या कोणत्याही विषयाचा अभ्यास करता येत नाही. त्यामुळे शासनाकडून अकरावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने केव्हा शिकवले जाणार? असा प्रश्न विद्यार्थी व पालक यांच्याकडून विचारला जात होता. अखेर येत्या सोमवारपासून ऑनलाइन वर्ग सुरू होणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील ९ हजार ५११ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन वर्गासाठी नोंदणी केली आहे त्यात विज्ञान शाखेचे सर्वाधिक ५ हजार २५६ विद्यार्थी आहेत. ऑनलाईन वर्गासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गाचे वेळापत्रक व आवश्यक तपशील ई-मेल व मोबाईल क्रमांकावर पाठविला जाणार आहे. शुभेच्छुक विद्यार्थ्यांनी https://covid19.scertmaha.ac.in/eleventh इथे नाव नोंदणी करता येईल.अकरावी ऑनलाईन वर्गासाठी नोंदणी केलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या
कला मराठी माध्यम : ४,५२७कला इंग्रजी माध्यम : २,३३७वाणिज्य मराठी माध्यम : ५,३५५वाणिज्य इंग्रजी माध्यम: १२,९५६विज्ञान : ३५,१८५