पुणे : उत्तरेकडील खराब हवामानामुळे पुणे विमानतळावरील विमान उड्डाणांच्या फेऱ्या सातत्याने रद्द होत आहेत. गेल्या पाच-सहा दिवसांपासून हे सत्र सलग सुरू असून गुरुवारी देखील १२ उड्डाणे रद्द झाली. यामध्ये पुण्याहून निघणारी ६ आणि पुण्यात येणारी ६ अशी एकूण १२ उड्डाणे रद्द केली आहेत.
हैदराबाद, मंगळुरू, गुवाहाटी, कोलकाता, चेन्नई, गोवा, कर्नाटक अशी येणारी व जाणारी उड्डाणे रद्द करण्यात आली असल्याची माहिती विमान प्रशासनाने दिली आहे. यामुळे सुमारे सातशे ते आठशे विमान प्रवाशांचा नियोजित प्रवास थांबला असून, दरम्यान संबंधित विमान कंपन्यांना प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता काळजी घेण्याच्या सूचना केल्या. तसेच विमानतळ प्रशासन आणि सीआयएसएफकडून विमानतळ टर्मिनलवर प्रवाशांसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे.