पुणे : दिवाळीत सदनिकेला कुलूप लावून बाहेरगावी गेलेल्या नागरिकांच्या घरांतील माैल्यवान ऐवजावर चाेरट्यांनी हात साफ केला. पुणे शहरात दिवाळीतील दि. २३ ते २९ ऑक्टाेबर दरम्यान १२ घरफाेड्यांच्या गुन्ह्यांत तब्बल ५१ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चाेरीला गेला. यामध्ये बंद घरांसह किराणा दुकाने आणि माेबाइल शाॅपही फाेडल्याचे निदर्शनास आले आहे.
दिवाळीच्या सुटीत पुण्यात राहणारे नागरिक माेठ्या संख्येने सहकुटुंब आपल्या मूळगावी गेले हाेते. शासकीय, खासगी कार्यालय आणि शाळा महाविद्यालयांना सुटी असल्याने अनेक जण पर्यटनासाठी बाहेरगावी फिरायला गेले हाेते. याचाच फायदा घेत शहरात बंद घरे हेरून घरफाेड्या केल्या गेल्या. अलंकार पाेलीस ठाणे हद्दीतील बंगला, कर्वेनगर, शिवनेरी नगर-काेंढवा खुर्द, आनंदनगर- सिंहगड रस्ता आदी भागात ५ ठिकाणी घरफाेड्याचे गुन्हे घडले.
सदनिका आणि बंगले फाेडण्यासह चाेरट्यांनी बंद दुकानेही लक्ष्य केले. हडपसरमधील माेबाइल शाॅपी, उंड्री, वारजेत गाेकुळनगर पठार येथील किराणा दुकाने फाेडून तेलाचे डबे, काजू, बदाम, तांदळाचे पाेते किराणा मालही चाेरला. सुखसागर नगर, बाणेर, वारजे, हडपसर भागातील दुकाने फाेडत रकमेवर हात साफ केला.
कोणत्या दिवशी कितीचा माल चाेरला
दिनांक/घरफाेडीच्या घटना/लंपास माल
२३ / ०३ / १६ लाख १० हजार रुपये
२४ / ०० / ००
२५ / ०१ / ७२ हजार रुपये
२६ / ०३ / ६ लाख ४ हजार
२७ / ०२ / २५ लाख ५७ हजार
२८ / ०२ / २ लाख ७२ हजार
२९ / ०१ / ६० हजार
घरफाेडीच्या माेठ्या घटना
१. अलंकार पाेलीस ठाणे हद्दीत गंगा विष्णू हाइटसजवळील बंगल्यात घरफाेडी : २५ लाख ४५ हजार रुपयांचे दागिने चाेरले
२. कर्वेनगर : येथील घरातून २२६ ग्रॅम्स साेन्याचे आणि ५० ग्रॅम्स चांदीचे दागिने असा ८ लाखांचा ऐवज चाेरला.
३. हडपसरमध्ये माेबाइल शाॅपीतून ७ लाखांचे ४० माेबाइल चाेरले
पाेलिसांकडून आराेपीचा शाेध सुरू
घरफाेडी झाल्याप्रकरणी पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रफितीच्या माध्यमातून चाेरट्यांचा माग काढला जात आहे. या गुन्ह्यांत अद्याप एकाही आराेपीस अटक करण्यात आलेली नाही.