पुणे : पुणे महापालिकेत अवघ्या वर्षभरापूर्वी नियुक्त झालेल्या १२ कनिष्ठ अभियंत्यांनी महापालिका सेवेचा राजीनामा दिला आहे. या सर्वांनी एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यापैकी काही जणांना वर्ग-२ च्या नियुक्त्या मिळाल्या आहेत. आता मोठे पद मिळत असल्याने पालिकेच्या नोकरीला रामराम केला जात आहे.
पुणे महापालिकेने कोरोना काळानंतर कनिष्ठ अभियंत्याच्या १२७ पदांची भरती घेतली होती. यासाठी तीन वर्षांच्या अनुभवाची अट होती. मात्र, यातील बहुतांश जणांनी स्पर्धा परीक्षा दिल्या होत्या. त्या निकालाची वाट न पाहताच अनेकांनी महापालिका अभियंता पदाची परीक्षा दिली. त्यात त्याची निवड झाली होती. एमपीएससी परिक्षांचे निकाल जानेवारी- फेब्रुवारीत लागले. त्यामध्ये अनेकांना वर्ग-२ च्या नियुक्त्या मिळाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामे दिले आहेत. या अभियंत्यांचा एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. महापालिकेने या नियुक्त्या करताना तयार केलेल्या प्रतीक्षा यादीची मुदतही १ वर्षच होती. ती जानेवारीमध्येच संपली. त्यामुळे आता हे १२ अभियंते पालिका सेवेतून मुक्त होत असले, तरी प्रतीक्षा यादीची मुदतही संपल्याने त्यातील उमेदवारांची संधीही हुकली आहे.
कनिष्ठ अभियंत्यांनी राजीनामा दिल्यानंतर एका महिन्याची मुदत असते. मात्र, या उमेदवारांनी एक महिन्याच्या वेतन भरण्याची तयारी दाखविली. त्यामुळे त्यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत. - प्रतिभा पाटील, प्रभारी उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग, पुणे महापालिका