पुणे : गुगल मॅपवर रिव्ह्यू व लाईक करण्याचे काम आहे, काम पूर्ण केल्यास चांगला परतावा देऊ, असे सांगून दाेन महिलांची फसवणूक केल्याच्या दाेन घटना समोर आल्या आहेत. याबाबत वडगाव बुद्रुक परिसरात राहणाऱ्या एका ४२ वर्षीय महिलेने सिंहगडरोड पोलिसांकडे तक्रार दिली आहे. ७ डिसेंबर ते १० डिसेंबर २०२३ या दरम्यान हा प्रकार घडला आहे. सुरुवातीला कामाचा माेबदला देऊन महिलेचा विश्वास संपादन केला. आणखी पैसे मिळू शकतात, असे आमिष दाखवून वेगवेगळी कारणे देऊन महिलेकडून ६ लाख ३० हजार रुपये उकळले.
दुसऱ्या घटनेमध्ये बालेवाडी परिसरात राहणाऱ्या ३१ वर्षीय महिलेने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. रिव्ह्यू आणि लाईक करण्याचा टास्क पूर्ण केल्यास भरघोस नफा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानंतर पैसे भरण्यास भाग पाडून एकूण ५ लाख ७१ हजार रुपये घेतले. पैसे भरूनही मोबदला देण्याचे बंद केल्याने तक्रारदार यांनी विचारणा केली. त्यावेळी कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली.