किरण शिंदे
पुणे : मायक्रो फायनान्स कंपनी द्वारे कर्ज मिळून देतो असे सांगून 100 ते 150 सर्वसामान्य लोकांचे फसवणूक करणाऱ्या हिरो-हिरोईन यांना अटक करण्यात आली. गुजरातच्या सुरत मधून या दोघांना अटक करण्यात आली. दोघेही युट्युब वर हिरो आणि हिरोईन म्हणून प्रचलित आहे. हेमराज जीवनलाल भावसार आणि दिपाली जितेंद्र पौनीकर (वय 32) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही सुरतमधील सुमन सार्थक सोसायटी सिंगनपूर येथील रहिवासी आहेत.
स्वारगेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघा बंटी बबलीने मायक्रो फायनान्स नावाची खोटी संस्था स्थापन केली. पुण्यातील मुकुंद नगर परिसरात या कंपनीचे कार्यालय थाटलं. त्यानंतर अनेक गरजू लोकांना पंधरा दिवसात कर्ज उपलब्ध करून देतो अशी खोटं बतावणी करून त्यांच्याकडून पैसे घेतले. या दोघांनी जवळपास 100 ते 150 लोकांची बारा लाख तीस हजार रुपयांनी फसवणूक केली. स्वारगेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी एका व्यक्तीने तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी गुजरात या ठिकाणी जाऊन या दोघांना अटक केली. त्यांनी आणखी कोणाची फसवणूक केली आहे का? किंवा फसवणूक करणारी त्यांची कुठली टोळी आहे का? लोकांकडून घेतलेली रक्कम त्यांनी कुठे ठेवली याचा तपास आता स्वारगेट पोलीस करत आहे. या दोघांना 25 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस कर्मचारी तारू, शेख, गायकवाड, घुले, गोडसे आणि होळकर यांनी केली आहे.