पुणे : लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यातून तिने एका मुलीला जन्म दिला. या मुलीला आपले नाव लावण्यासाठी त्याने महिलेकडून तब्बल १२ लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी विरेश यशवंत म्हस्के (वय ४०, रा. गणेशनगर, वडगावशेरी) याला अटक केली आहे.
याप्रकरणी एका ३८ वर्षांच्या महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १२ फेब्रुवारी ते १९ जून २०२३ दरम्यान घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरेश म्हस्के याने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून नाश्तामधून गुंगीचे औषध दिले आणि त्यांच्याशी शारीरिक संबंध केला. त्याचा व्हिडीओ काढून वेळोवेळी शरीरसंबंध केला. यातून महिला गर्भवती राहिल्या. त्यांनी ससून रुग्णालयात मुलीला जन्म दिला. जन्माचे कागदपत्रावर वडील म्हणून स्वत:चे नाव लावण्यासाठी त्याने फिर्यादीकडे २० लाख रुपयांची मागणी केली. त्यांच्याकडून बँकेचे कर्ज काढून व त्यांच्या खात्यावर रोख स्वरुपात असे एकूण १२ लाख रुपये घेतले. पोलिस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहे.