पुणे : परदेशात सिनियर जनरल मॅनेजर पदावर नोकरी मिळवून देतो असे सांगून एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार कोथरूड परिसरात घडला आहे. एका ५३ वर्षीय महिलेने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, शालिनी शर्मा नावाच्या महिलेचा त्यांना फोन आला. एका सल्लागार कंपनीमध्ये काम करत असल्याचे महिलेने सांगितले. कॅनडा या देशात सिनियर जनरल मॅनेजर हे पद रिक्त असून तुम्ही तेथे काम कारण्यास इच्छूक आहात का अशी तक्रारदार महिलेला विचारणा केली.
तक्रारदार महिलेने संमती कळवल्याने आरोपी महिलेने रजिस्ट्रेशन फी, कन्सल्टेशन फी, विजासाठी लागणारी फी अशी वेगवेगळी कारणे देत पैशांचा तगादा लावला. महिलेने एकूण ११ लाख ९१ हजार ४१९ रुपये भरले तरीसुद्धा नोकरी न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुढील तपास करत आहेत.