पुणे: स्टॉक मार्केट ट्रेडिंग करून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका वकिलाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि. २८) स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार शिवाजीनगर कोर्टात वकिली करणाऱ्या एका ४९ वर्षीय व्यक्तीने स्वारगेट पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही घटना ५ डिसेंबर ते १६ जानेवारी या दरम्यान घडली आहे. फिर्यादी यांना सायबर चोरट्याने एका व्हाॅट्सॲपद्वारे संपर्क साधला. वेगवेगळ्या शेअर मार्केट ट्रेडिंग आणि आयपीओ सबस्क्राईब करून चांगला मोबदला मिळतो असे सांगितले. फिर्यादींनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यावर त्यांना ग्रुपमध्ये ॲड केले. त्यामध्ये दररोज शेअर मार्केट आणि आयपीओमध्ये गुणतवणूक संदर्भात माहिती दिली जात होती. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो, असे वेगवेगळे स्क्रिनशॉट पाठवून भासवले जात होते. त्यातील एका व्यक्तीने अधिकृत एजंट असल्याचे सांगून तीन पट नफा देण्याच्या आमिषाने एक अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादींना ऑनलाईन पद्धतीने क्लासेस घेत आयपीओ सबस्क्राईब करायचे शिकवून पैसे गुंतवण्यास भाग पडले. यात फिर्यादी यांनी तब्बल १० लाख रुपयांची गुंतवणूक केली. यानंतर त्यांच्या ॲपवर शेअर ट्रेडिंगमधून फायदा झाल्याचे दिसून येत होते. मात्र, फिर्यादी यांना ते पैसे काढता येत नव्हते म्हणून त्यांनी सायबर चोरट्यांशी संपर्क केला तेव्हा वेळोवेळी आणखी पैसे भरा असा तगादा लावला जात होता. पैसे मिळणार नाहीत, याची खात्री झाल्यावर त्यांनी स्वारगेट पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.