पुणे: सागरी प्रदूषण आणि त्यामुळे संकटात सापडलेलं समुद्री जीवन ही संपूर्ण जगासमोरील अतिशय गंभीर समस्या आहे. मात्र यावर पुण्यात राहणाऱ्या एका 12 वर्षीय मुलानं भन्नाट उपाय शोधून काढला आहे. हाजिक काजी नावाच्या मुलानं एका जहाजाचं मॉडेल तयार केलं आहे. हे जहाज जल प्रदूषण कमी करण्यात आणि सागरी जीवन वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. 12 वर्षांच्या या मुलाच्या संशोधनाचं सध्या जगभरात कौतुक होत आहे. सागरी जीवांवर कचऱ्याचा अतिशय वाईट परिणाम होतो, असं मी काही माहितीपटांमध्ये पाहिलं होतं, असं हाजिक काजीनं सांगितलं. 'समुद्रातील प्रदूषणाचा जलचरांवर घातक परिणाम होतो. त्यामुळे याबद्दल काहीतरी करायला हवं, असा विचार माझ्या मनात आला,' असंही तो पुढे म्हणाला. 'आपण जे मासे खातो, ते मासे समुद्रातील प्लास्टिक खातात. त्यामुळे आपण एकप्रकारे समुद्रातील घाण खात आहोत. याचे माणसाच्या जीवनावर मोठे दुष्परिणाम होतात. त्यामुळेच मी एका जहाजाचं डिझाईन तयाप केलं आहे. हे जहाज समुद्रातील कचरा स्वच्छ करेल. मी याला इर्विस (ERVIS) असं नाव दिलं आहे,' अशी माहिती हाजिकनं दिली. 'इर्विस सेंट्रिपेटल फोर्सचा वापर करुन कचरा खेचून घेईल. यानंतर ते पाणी, समुद्री जीवन आणि कचऱ्याचं वर्गीकरण करेल. यापुढे इर्विस सागरी जीवन आणि पाणी पुन्हा समुद्रात पाठवेल. तर प्लास्टिकचं 5 भागांमध्ये वर्गीकरण केलं जाईल,' असं हाजिक काजीनं सांगितलं. काजी यांनी त्यांची संकल्पना टेडएक्स आणि टेड8 या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर मांडली आहे. त्याच्या या संकल्पनेचं जगातील अनेक तज्ज्ञांनी आणि ख्यातनाम संस्थांनी तोंडभरुन कौतुक केलं आहे.
पुण्यातल्या 12 वर्षांच्या मुलाचा भन्नाट शोध; समुद्राची प्रदूषणापासून होणार सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 2:18 PM