इंदापूर : भाटनिमगाव (ता. इंदापूर) येथील इंद्रकुमार पंजाबराव गायकवाड या बारा वर्षांच्या मुलाचा सख्ख्या मावसकाकाने खून केल्याची घटना गुरुवारी (दि.२३) दुपारी टेंभुर्णीनजीक पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या शिराळ गावाच्या हद्दीत घडली. याबाबत विश्वास जनार्दन साळुंके (वय ४०, रा. मुंबई, मूळ गाव परांडा, जि. उस्मानाबाद) याला ताब्यात घेण्यात आले आहे.विश्वास साळुंके हा गावाच्या यात्रेनिमित्त भाटनिमगाव येथे आला होता. गुरुवारी दुपारी तीन वाजता इंद्रकुमार पंजाबराव गायकवाड व आर्यन रावसाहेब गायकवाड या चुलतभावांना टेंभुर्णी येथे चांगले मासे मिळतात, आपण घेऊन येऊ, असे सांगून साळुंके त्या दोघांना घरातून घेऊन गेला. आर्यन यास ‘तू इथेच थांब, आम्ही टेंभुर्णीहून मासे घेऊन येतो, असे म्हणून उजनी पाटीजवळील रसाच्या दुकानात सोडून इंद्रकुमारला टेंभुर्णी (जि. सोलापूर) कडे घेऊन गेला.शिराळपाटीजवळ आल्यावर ढाब्याच्या मागील उसाच्या शेतात नेऊन त्याचा हातरुमालाने गळा आवळून विश्वासने निर्दयीपणे खून केला. तेथून तो पसार झाला. आर्यन हे दोघे का येत नाहीत, म्हणून रडू लागल्यानंतर रसवंतीगृह चालकाने त्यास भाटनिमगाव येथे घरी नेऊन सोडले. आरोपी करमाळा पोलीस स्टेशनमध्ये स्वत:हून हजर झाला. त्याने खून केल्याची कबुली दिली. त्याला करमाळा पोलिसांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये आणून, प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन खात्री करत, मृतदेहाची ओळख पटवली. आरोपी व मयताचे वडील हे सख्खे मावसभाऊ आहेत. त्यांनी पाच वर्षांपूर्वी भागीदारीत जेसीबी मशीन विकत घेऊन व्यवसाय सुरू केला होता. दोघांत व्यवहारातून वाद झाल्याची चर्चा होती. ऐन यात्रेच्या वेळी ही घटना घडल्याने, गावावर शोककळा पसरली आहे. (वार्ताहर)
बारा वर्षीय मुलाचा मावसकाकाने केला खून
By admin | Published: March 25, 2017 3:28 AM