पुणे : जुही सपके , वय - अवघे १२ वर्ष...वय जरी लहान वाटत असले तरी इतर मैत्रिणी अभ्यासात रमल्या असताना ती मात्र ब्युटी इन्स्टिट्यूटमध्ये रमते. आई भक्ती सपके यांच्यात हातात असलेली केश सौंदर्य खुलवण्याची कला जुहीने घेतली असून तिच्या हातून हेअर स्टाईल कारण्यासाठी अनेक जणी गर्दी करत असतात. जुहीच्या आई वडिलांचे पुण्यातील कोरेगाव पार्क भागात इंटरनॅशनल ब्युटी इन्स्टिट्यूट आहे. त्यामुळे लहानपणापासून जुही तिथे जात होती. दोन वर्षांपूर्वी आईसोबत तिथे गेल्यावर कंटाळा आल्याने तिने नकली केस असलेल्या पुतळ्यावर प्रयोग करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिथे असलेल्या प्रशिक्षकांनी तिचे कसब ओळखले. तिथून तिचा केशरचना आणि त्यावर प्रक्रिया करण्याचे शिकण्यास सुरुवात झाली. विशेषतः केशरचनेतले सर्व यंत्र ती लीलयापणे हाताळते. सध्यातरी ती फक्त सुट्टीमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये येते. आजवर तिने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला असून भरपूर बक्षिसेही मिळवली आहेत. इतकी लहान मुलगी केशरचना करणार म्हटल्यावर सुरुवातीला ग्राहक काहीसे आश्चर्यचकित होत असत, तिला जमेल की नाही याबाबत सशांकही असत पण तिचे काम आणि निपुणता बघितली की त्यांना जुहीच हवी असल्याचा अनुभव जुही सांगते.याबाबत जुहीला विचारले असता तिने याच क्षेत्रात करिअर करणार असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर फक्त केशरचना नव्हे तर सौंदर्य शास्त्रातील प्रत्येक भाग मला शिकायचा असल्याचे ती आवर्जून सांगते.