पुणे : देशात ४०० वंदे भारत ट्रेन टप्प्याटप्प्याने सुरू होणार असून, या ट्रेनसाठी लागणारे कोचेस महाराष्ट्रात बनवणार आहेत. ४०० पैकी १२० वंदे भारत ट्रेनचे डब्बे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात बनविण्याचे काम लवकरच सुरू होणार असून, त्यामुळे मराठवाड्याच्या विकासात भर पडणार असल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
रेल्वे मंत्रालय आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या न्यू आष्टी-अहमदनगर या ६६ किमी रेल्वे लाइनचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी न्यू आष्टी रेल्वेस्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून रेल्वे मार्गस्थ झाली. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, डॉ. सुजय विखे पाटील, आमदार सुरेश धस, राम शिंदे, बाळासाहेब आजबे, लक्ष्मण पवार, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी, माजी आमदार शिवाजी कर्डिले आणि नगराध्यक्षा पल्लवी धोंडे उपस्थित होते.
यावेळी दानवे म्हणाले, मराठवाडा विदर्भ हा मागासभाग आहे, येथे दळणवळणाची साधने कमी असल्यामुळे या भागाचा विकास झालेला नाही. पण या भागाला निधी देण्याचे काम फडणवीस सरकारने केले आहे. नगर - परळी या रेल्वे लाइनचे स्वप्न मुंडेसाहेबांनी पाहिले होते. ते आता प्रत्यक्षात येत आहे. नगर - परळी - बीड मार्ग पूर्ण होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने मुंडेसाहेबांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या मार्गाचे काम वेगाने सुरू असून, आतापर्यंत ९६ टक्के जमिनीचे भूसंपादन यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. येत्या मार्च २०२३ पर्यंत हा मार्ग आम्ही पूर्ण करणार आहोत, असेही दानवे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग पूर्ण करणे हीच खरी मुंडेसाहेबांना आदरांजली असेल. या रेल्वेमार्गाच्या प्रकल्पाला खऱ्या अर्थाने गती मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर मिळाली.