लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ३१ डिसेंबर आणि नववर्षांच्या पार्ट्यासाठी दिल्लीहून आणण्यात आलेला ३४ किलो चरस लोहमार्ग पोलिसांनी जप्त केला आहे. हा चरस पुणे, मुंबई, नागपूर, गोव्यातील नववर्षाच्या पार्टीसाठी पब, हाॅटेलमधून विकला जाणार होता. हा चरस ३ हजार रुपये प्रति ग्रॅम भावाने विकला जातो. बाजारभावाने विकला गेला असता तर त्याची किंमत तब्बल १२० कोटी रुपये होते. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
ललितकुमार दयानंद शर्मा (वय ४९, रा. कुलु, हिमाचल प्रदेश) आणि कौलसिंग रुपसिंग सिंग (वय ४०, रा. लोहडी, कुलु, हिमाचल प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३४ किलो ४०४ ग्रॅम वजनाचा ओला चरस जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईची माहिती लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी दिली. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर विविध शहरात रेव्ह पार्ट्या आयोजित होतात. त्यात अमली पदार्थांचा वापर केला जातो. या अनुषंगाने पुणे जिल्ह्यात विशेष मोहीम हाती घेण्यात आली. वायसे यांना हिमाचल प्रदेशातील त्यांच्या ‘बॅचमेट’ पोलीस अधीक्षकाने याबाबत माहिती दिली होती. त्यानुसार पोलिसांनी दिल्लीहून येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची तपासणी सुरु केली. गेले ७ दिवस ४ पोलीस अधिकारी व ४५ पोलीस कर्मचारी ही तपासणी करीत होते. शनिवारी रात्री वाडिया कॉलेज येथील पुलाखाली दोघे जण येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना पकडले. त्यांच्याकडील बॅगेत ३४ किलो चरस आढळून आला.
ही कामगिरी अपर पोलीस महासंचालक संदीप बिश्नोई, पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर -पवार, पोलीस निरीक्षक मौला सय्यद, पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौंड, हवालदार संतोष लाखे, तसेच माधव केंद्रे, अशोक गायकवाड, गंगाधर ईप्पर, रमेश शिंदे, श्रीकांत बोनाकृती, कैलास जाधव यांनी केली.
चौकट
या शहरात जाणार होते चरस
ललितकुमार शर्मा याचा हिमाचल प्रदेशात ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत पुण्यात आणण्यात आलेल्या चरसपैकी २२ किलो मुंबईत, ५ किलो गोव्यात, ५ किलो बंगलोरला, २ किलो चरस पुण्यात देण्यात येणार होता. पुण्यातील व आजूबाजूच्या हॉटेल, पब व इतर जिल्ह्यांमध्ये हा माल वापरला जाणार होता. याची खातरजमा १०० पोलीस मित्रांद्वारे केली जात आहे. पुरावा आढळल्यास संबंंधित हॉटेल, पब कायमचे बंद करण्याबाबत लोहमार्ग पोलीस, राज्य गुप्तावार्ता, एनसीबी व इतर खासगी एजन्सींची मदत घेत आहे.