पुणे : आर्थिक वर्षातील पहिल्या सात महिन्यांत महापालिकेला मागील वर्षीच्या तुलनेत स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) माध्यमातून १२० कोटीं रुपयांचे अधिकचे उत्पन्न मिळाले आहे. राज्य सरकारने स्थानिक संस्था कराच्या उलाढालीची मर्यादा वाढवूनही सात महिन्यांत पालिकेच्या तिजोरीत ८३३ कोटी रुपये जमा झाले आहेत.राज्य सरकारने आॅगस्ट महिन्यापासून एलबीटीच्या उलाढालीची मर्यादा ५० कोटी रुपये केली. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांची एलबीटीतून सुटका झाली. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होईल, अशी ओरड झाली. त्यासाठी राज्य सरकारने अनुदान स्वरूपात निधी उपलब्ध करून दिला. सरकारकडून मिळणाऱ्या पालिकेच्या वाट्याचे सुमारे ८० कोटी रुपयांसह ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांकडूनही दरमहा ३५ ते ४० कोटी रुपये पालिकेला मिळाले. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यांमध्ये एलबीटीतून पालिकेला एकून ८३३ कोटी ६८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षी याच कालावधीत एलबीटीचे उत्पन्न ७१२ कोटी ५२ लाख रुपये एवढे होते. याचा विचार केल्यास पालिकेच्या उत्पन्नात सुमारे १२१ कोटी रुपये वाढ झाल्याचे दिसते.
एलबीटीच्या उत्पन्नात १२० कोटींनी वाढ
By admin | Published: November 22, 2015 3:38 AM