पुणे : गडकिल्ल्यांवर गेल्यानंतर अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्या पाहायला मिळतात. त्यामुळे गडाचा परिसर विद्रूप हाेत असे. त्यावर उपाय म्हणून आता वन विभागाच्या वतीने किल्ले शिवनेरीवर ‘आरओ प्लांट’ बसविण्यात येत आहे. तसेच प्लास्टिकची बाटली गडावर न्यायची असेल तर त्यासाठी नोंदणी करून न्यावी लागते. यामुळे पर्यटकांना आता कुठेही प्लास्टिकची बाटली फेकून देता येणार नाही.
अनेक वर्षांपासून गडावर प्लास्टिक बाटल्यांचा खच पडत होता. त्या पाहून अनेक शिवप्रेमी संस्थांनी त्या संकलित करण्याचा उपक्रम राबविला. आजही अनेक संस्था त्या प्रकारचे काम करून गड स्वच्छ ठेवतात; पण यावर ठोस धोरण करण्यासाठी सरकारने गडावर प्लास्टिक बाटल्यांवर बंदी घातली. गडावरच पिण्याचे पाणी पर्यटकांना मिळणार आहे. परिणामी प्लास्टिक बाटल्यांचा कचरा साठणार नाही.
याविषयी द ट्रास ग्रुपच्या वतीने केदार पाटणकर गेली अनेक वर्षे गडांवरील प्लास्टिक बाटल्यांच्या कचऱ्याबाबत जनजागृती करत आहेत. त्यांच्या या अभियानाला अखेर यश आले. आता शिवनेरीवर पाण्याची सोय होत असून, प्लास्टिकच्या बाटल्यांवरही बंदी आली. सध्या शिवनेरीवर जाताना पायथ्याला पर्यटकांना जर प्लास्टिकची बाटली सोबत न्यायची असेल तर त्यांना नाव नोंदणी करून ५० रुपये अनामत रक्कम भरावी लागते. त्यांनी बाटली गडावरून खाली आल्यावर परत दिली की, त्यांना अनामत रक्कम परत दिली जाते. ज्यांना बाटली न्यायची नसेल, त्यांच्यासाठी वर पाण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.
किल्ले शिवनेरीवर बालेकिल्ल्याच्या ठिकाणी १२ हजार लिटर क्षमतेचा ‘आरओ प्लांट’ बसविण्यात येईल. तसेच खाली पायथ्याला पाच पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत. त्यामधून पर्यटकांना शुद्ध पिण्याचे पाणी घेता येईल. - अमोल सातपुते, उपवनसंरक्षक, जुन्नर वन विभाग