पुणे : दस-याच्या सणासाठी पुणेकरांकडून झेंडूला चांगलीच मागणी असते. यामुळे जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून रविवार (दि.६) रोजी गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील फुल बाजारात तब्बल १२२ टन झेंडूच्या फुलांची आवक झाली. यामध्ये तुळजापुरी झेंडूची सुमारे ७ टन आवक आहे.
शहर आणि जिल्ह्यात सर्वत्रच विजयादशमीचा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्त घरातील सर्व वस्तूचे पूजन करणे, नवीन वस्तू खरेदी असो की घर मोठ्या प्रमाणात उलाढाल देखील होत असते. यामुळे दस-यांला सर्वच फुलांना चांगली मागणी असते. झेंडूसह शेवंती, ऑस्टर, गुलछडी, जबेर्रा, गुलाब यासह इतर फुलांनाही मोठ्या प्रमाणात मागणी असते. रविवारी मार्केट यार्डात पांढरी शेवंती १९ हजार ३५५ किलो, पिवळी शेवंती २ हजार १३ किलो, सुट्टा ऑस्टर ४ हजार ९९ किलो, गुलछडी ६ हजार ८७७ किलो, जबेर्रा ९ हजार १७५ गड्डी, डचगुलाब ६ हजार ५० गड्डी इतकी आवक झाली असल्याची माहिती फुलबाजार विभाग प्रमुख प्रदीप काळे यांनी दिली.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फुल बाजार विभागात झेंडूची अधिकृत ११५ टन इतकी आवक झाली आहे. तर मार्केट यार्डासह शहरात विविध ठिकाणी अनेक शेतकरी थेट झेंडूची विक्री करत आहेत़ झेंडूला प्रतिकिलोस २० ते ५० रुपये, तुळजापुरी झेंडूस ४० ते ६० रुपये, पांढरी शेवंती ६० ते १३० रुपये प्रतिकिलोस दर मिळत आहेत, तर किरकोळ बाजारात ५० ते १०० रुपये प्रतिकिलोने झेंडूची विक्री केली जात आहे. दरवर्षी दसऱ्याला नेहमीच फुुलांची मोठी मागणी असते. त्यामुळे दसऱ्याला दर मिळेल या अपेक्षेने शेतकरी माल राखून ठेवत असतात. त्यानुसार पुणे जिल्ह्यास सोलापूर, नगर, कोल्हापूर, जिल्ह्याहून फुलांची आवक झाली आहे. मार्केट यार्डातील सर्व रस्त्यांवर किरकोळ विक्रेते, शेतकरी फुलांची विक्री करत आहेत. पहाटेपासूनच किरकोळ विक्रेते, ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत फुलांच्या दरात वाढ झाली आहे़ मात्र दरामध्ये फारशी वाढ झाली नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.