पुणे : पुणे जिल्हा परिषदेने लायन्स कल्बच्या मदतीने नवीन वर्षात जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा निर्धार केला असून, गेल्या २ महिन्यांत कुपोषणातून १ हजार २२० बालके नॉर्मल करण्यात यश आले आहे, तर तीव्र कुपोषणातून ६६ बालकांना बाहेर काढण्यात आले आहे. पुणे जिल्हा परिषद, महिला व बाल कल्याण विभागांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या वतीने कुपोषण निर्मूलन अभियान सुरू आहे. यात पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ आरोग्य सेवा, आरोग्य आणि सकस आहारविषयक शिक्षण, औपचारिक शालेय पूर्व शिक्षण इत्यादी ६ महत्त्वाच्या सेवा दिल्या जाणार आहेत. जिल्ह्यात २० प्रकल्पांच्या माध्यमातून ४,५८१ अंगणवाड्या कार्यरत असून, तेथे हा प्रयोग करण्यात येत आहे.सुरुवातीला मावळ तालुक्यात हा प्रयोग लायन्स क्लब वडगावच्या माध्यमातून गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात राबविण्यात आला. त्याला चांगले यश आल्यानंतर मावळच्या धर्तीवरच जिल्ह्यात लायन्सच्या मदतीने हे अभियान राबविण्यात येत आहे. बालविकास केंद्र तयार करण्यात येऊन लायन्सच्या माध्यमातून बालकांना पूरक आहार देण्यात येत आहे. यात पोषक शेंगदाणा लाडू, केळी, सफरचंद, बटाटा व तीन प्रकारची औषधे दिली जातात. जानेवारीपासून सुरू झालेल्या या अभियानात सुरुवातीला ३०५ बालके ही तीव्र कुपोषित व १ हजार ७८२ बालके मध्यम कुपोषित होती. गेल्या ३ महिन्यांत यातील ३०५ तीव्र कुपोषित बालकतिंून १४८ बालके मध्यम गटात आणण्यात आली असून, ६६ बालके सर्वसाधारण झाली आहेत. तर, १ हजार ७८२ मध्यम कुपोषित बालकांपैकी १ हजार १५४ बालकांना सर्वसाधारण करण्यात यश आले आहे. यात सर्वाधिक दौंड तालुक्यातील तीव्र कुपोषित २५ बालके नॉर्मल झाली असून, त्यानंतर आंबेगाव तालुक्यातील १७ बालकांचा समावेश आहे. मात्र, बारामतीसारख्या पुढारलेल्या तालुक्यातील कुपोषण काही कमी होताना दिसत नाही. येथील फक्त ५ बालके नॉर्मल झाली आहेत. (प्रतिनिधी)
कुपोषणातून १,२२0 बालके नॉर्मल!
By admin | Published: April 22, 2016 1:13 AM