लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातच नाही तर संपूर्ण देशात लसीकरणात आघाडीवर असलेल्या पुणे जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. यात ग्रामीण भागात तर लस उपलब्ध न झाल्याने गुरुवारी १२३ लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली. ग्रामीण भागात दररोज सरासरी ५० हजार डोस देण्याची क्षमता असताना आता केवळ ३१ हजार ७४३ डोस शिल्लक आहेत. यामुळे शासनाने तातडीने लस उपलब्ध करुन न दिल्यास शनिवारपासून जिल्ह्यातील लसीकरण ठप्प होऊ शकते.
जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत आहे. यामुळेच जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला. यात संपूर्ण जिल्ह्यात ५१६ लसीकरण केंद्र असून, यात एकट्या ग्रामीण भागात सर्वाधिक म्हणजे ३१८ केंद्र सुरू आहेत.
ग्रामीण क्षेत्रात ९८ प्राथमिक आरोग्य केंद्रांबरोबरच १७४ उपकेंद्रे आणि काही प्राथमिक शाळांमध्येही लसीकरण केंद्रे सुरू केली. जिल्ह्यात सोमवारी विशेष मोहीम राबवून ग्रामीण क्षेत्रात एका दिवसात उच्चांकी ४८ हजार २८२ जणांना लसीकरण केले. ग्रामीण भागात दिवसाला सरासरी ५० हजार लसीकरण करण्याची क्षमता निर्माण झाली आहे. आता पर्यंत ग्रामीण भागात ४ लाख ८९ हजार लोकांचे लसीकरण झाले आहे. परंतु आता लसच उपलब्ध होत नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
----
गावागावात प्रचार, प्रसिद्धी केली, पण आता लसच नाही
जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली. लसीकरणाची माहिती ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पदाधिकारी, सदस्यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी केली. यामुळे एका-एका केंद्रावर शंभर पेक्षा अधिक लोक जमा होतात, पण लसीचा तुटवडा असल्याचे सांगत दोन दिवस एका केंद्रावर ३०-४० डोस दिले. यामुळे ग्रामीण भागात लोकांची नाराजी निर्माण होत आहे. शासनाने तातडीने मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करून द्यावी
- बाबूराव अप्पा वायकर, कृषी सभापती, पुणे जिल्हा परिषद
-----
जिल्हा - पुणे जिल्हातील ग्रामीण भागातील लसीकरण
एकूण लसीकरण केंद्रे - ३१८
सुरू - १९५
बंद -१२३
एकूण लसीकरण - ४८९०००
डोस शिल्लक - ३१७४३