चिंचवड : विविध समस्यांमुळे त्रस्त उद्योगनगरातील पत्राशेडमधील १२५ घरांतील अनधिकृत वीजपुरवठा महावितरणने बंद केला. या कारवाईमुळे रहिवाशी संतप्त आहेत.झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत वेताळनगरातील रहिवाशांचे उद्योगनगर येथील पत्राशेडमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. पत्राशेडमधील रहिवाशांकडे अनधिकृत वीजजोड असल्याने येथील १२५ घरांतील विद्युत पुरवठा गुरुवारी महावितरणने खंडित केला. संतप्त रहिवाशांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प कार्यालयावर हल्लाबोल करीत तेथील विद्युत पुरवठा खंडित केला.सकाळी साडेदहा वाजता महावितरण कंपनीचे अधिकारी व पोलिसांचा ताफा भोईरनगर चौकात दाखल झाला. काही वेळातच पत्राशेडमधील विद्युत पुरवठा बंद करण्याचे काम सुरू झाले. कार्यकारी अभियंता धनंजय औडेकर यांच्यासह अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिल बडवे, धवल सावंत, आर. एस. खडतकर, मंगेश साळुंखे यांच्यासह मनोज पुरोहित, संतोष झोडगे व महावितरणचे ४० कर्मचारी कारवाईत सहभागी होते. चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सांगळे यांच्यासह सहा पोलीस अधिकारी व ३० पोलीस असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.पत्रा शेड भागात ३ वर्षांपासून अनधिकृत विद्युत पुरवठा सुरू होता. येथील १२५ घरांचा विद्युत पुरवठा खंडित केला असून, याबाबत कायदेशीर कारवाई करणार असल्याचे औडेकर यांनी सांगितले.विद्युत पुरवठा बंद केल्याने संतप्त झालेल्या पत्रा शेडमधील रहिवाशांनी चिंचवड गावातील झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयात दुपारी एक वाजता जाऊन कार्यालयातील विद्युत पुरवठा बंद केला. कोऱ्हाळे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, याबाबत आयुक्त निर्णय घेतील, अशी उत्तरे मिळाल्याने त्यांनी आयुक्त राजीव जाधव व महापौर शकुंतला धराडे यांच्याशी संपर्क साधला. मात्र, तोडगा निघाला नाही. आयुक्त शहराबाहेर असल्याने याबाबत निवेदन द्यावे, अशी विनंती करण्यात आली. मात्र, नागरिक संतप्त असल्याने याबाबत तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात येत होती. नवीन मीटर दिल्यास आम्ही त्याचे बिल भरू, असे नागरिक सांगत होते. मात्र, नवीन मीटरचे पैसे पालिका प्रशासनाने द्यावेत, अशी मागणी ते करीत होते. (प्रतिनिधी)
पत्रा शेडमधील १२५ जणांची वीज तोडली
By admin | Published: May 08, 2015 5:25 AM