महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे तब्बल १३ लाख १७ हजार विद्यार्थ्यांची इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार होती. परंतु, कोरोनामुळे या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात आली. बारावीनंतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षा घेतली जाते. मात्र, महाविद्यालय स्तरावरील पदवी अभ्यासक्रमासाठी इयत्ता बारावीच्या गुणांवरच प्रवेश दिला जातो. मात्र, बारावीचा निकाल विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनावर किंवा दहावी, अकरावी, बारावी या तीन ही वर्गातील गुणांच्या आधारे निकाल प्रसिद्ध केल्या जाण्याची शक्यता आहे.
------------------
इयत्ता बारावीनंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर, विधी, कृषी, डीएड आदी अभ्यासक्रमास कधी प्रवेश घेतात. सर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पूर्व परीक्षा असते. तसेच जेईई, जेईई ॲडव्हान्स आदी प्रवेश पूर्व परीक्षा देऊन आयआयटी सारख्या नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळवतात.
------------------------
राज्य शासन व विद्यापीठ स्तरावर बारावीनंतरच्या कला, वाणिज्य, विज्ञान आदी सर्व पदवी अभ्यासक्रमासाठी एकच सीईटी परीक्षा घ्यायला हवी. काही नामांकित महाविद्यालयांकडून स्वतंत्रपणे सीईटी घेतली जाते. यावर्षी अशा सीईटी परीक्षा घेणे शक्य होईल का? याबद्दल आताच सांगता येणार नाही.
- डॉ. प्रवीणसिंह परदेशी, प्राचार्य, फर्ग्युसन महाविद्यालय
--------------
विद्यापीठांच्या सहकार्याने ऑनलाइन पद्धतीने बारावीच्या परीक्षा घेण्याचा विचार करता आला असता. पण आता बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यापीठ स्तरावरून सर्व शाखांच्या अभ्यासक्रमासाठी संयुक्तपणे सीईटी परीक्षा घ्यावी लागेल. या परीक्षेच्या आधारेच महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देता येतील.
- डॉ. संजय चाकणे, प्राचार्य, इंदापूर महाविद्यालय
-----------------
राज्य शासनाकडून इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कोणत्या पद्धतीने जाहीर केला जातो, हे पाहावे लागेल. परंतु, बारावीनंतरच्या प्रवेशात पारदर्शकता असण्यासाठी सीईटी परीक्षेचा पर्याय योग्य ठरेल.
- तन्वी पवार, विद्यार्थी
------------
बारावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत परीक्षांच्या आधारे मूल्यमापन करावे लागणार आहे. या गुणांवर विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणे उचित ठरणार नाही. त्यामुळे सीईटी परीक्षा घेण्याचा पर्याय स्वीकारावा लागेल.
- पल्लवी पवार, पालक
------
प्रत्येक महाविद्यालयाचे सीईटी परीक्षा देणे विद्यार्थ्यांना सोयीचे होणार नाही. त्यामुळे विद्यापीठाने किंवा राज्य शासनाने कला, वाणिज्य ,विज्ञान आदी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्वतंत्रपणे सीईटी परीक्षा द्यावी.
ईश्वरी पाटील, विद्यार्थी
-------
परीक्षा रद्द केल्यामुळे बारावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर होणार आहे. सीईटी परीक्षा घेतली जाणार की नाही याबद्दल शंका आहे. त्यामुळे इयत्ता पाचवी पासून दहावीपर्यंतचे विद्यार्थ्यांचे निकाल पाहून बारावीचा निकाल जाहीर करावा. याच आधारे विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश द्यावा.
- नंदा पाटील, पालक,