लोकमत न्यूज नेटवर्कडेहणे : पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्याच्या पश्चिमेला शेवटची वस्ती, भीमाशंकरपासून ७ कि.मी. गर्दराईत जेमतेम बारा ते तेरा घरे असलेले छोटे आदिवासीवस्ती असलेले गाव. खाली खांडस-काठेवाडी, तर वर भीमाशंकर या दोन्हीच्या मध्ये सह्याद्रीच्या अजस्र डोंगराच्या कुशीत नव्हे कडेवर वसलेली १३ कुटुंबांची जगापासून अगदी अलिप्त वस्ती. डोंगराच्या मधोमध पदरात वसलेली वाडी म्हणून पदरवाडी हे नाव. दळणवळणाची सुविधा नसल्याने पदरवाडीच्या लोकांना खाली कोकणात जायचं असेल तर महाराष्ट्रात कोठेही नसेल असा जीवघेणा शिडी घाट किंवा गणेश घाट पार करण्यावाचून पर्याय नाही. तसं भीमाशंकरला जायला शिडी घाटाइतका अवघड मार्ग नसला तरी ५किमी दमछाक करणारे जंगल आणि डोंगराचा रस्ता. उदरनिर्वाहासाठी रोजची वणवण. भातपीक हे एकमेव उत्पन्नाचे साधन. भात व रानभाज्या हाच रोजचा आहार.रस्ता, पाणी, वीज, आरोग्य आणि शिक्षण या सुविधांपासून कोसो दूर असलेली ही वस्ती मात्र केव्हाही कोसळणाऱ्या महाकाय डोंगराच्या अगदी पायथ्याशी आहे. पायथा म्हणजे खाली असलेली कोकणकड्याची अजस्र कातळाची दरी. इतर वेळी लेकरा-बाळांचं पोट भरणारा गावाच्या वरचा हा डोंगर पावसाळ्यात पदरवाडीच्या या आदिवासी कुटुंबांना काळासमान वाटतो. भूस्खलनाच्या कोसळणाऱ्या संकटाच्या आपत्तीने घेरली गेलीली माणसं जीव मुठीत धरून दिवस ढकलत आहेत . येथील गोविंद डामसे, भामा काठे, भानुदास दिवारे व त्यांच्या कुटुंबाना पुनर्वसन करण्यासाठी अनेकदा आश्वासने दिली. परंतु कागदी घोडे नाचवण्याच्या शासनाची नेहमीच्या पद्धतीने या अदिवासी कुटुंबांचा जीव मात्र धोक्यात आला आहे.आमची ९ कुटुंबे, त्यांचा विस्तार धरून १३ झाली. आजपर्यंत सरकारचा माणूस आमच्या दारात उभा राहिला नाही. पाणी नाही, शाळा नाही,लाइट नाही. रस्ता तर कधीच मिळणार नाही. हे आम्हालाही माहीत आहे ; पण उभ्या डोंगराखाली इथं जीव कव्हा पण जाइल तवा सरकारनं कुठतरी याच रानात निवाऱ्याला घरं बांधून द्यावीत. शाळेतल्या पोरांना शाळा मिळावी बाकी आम्ही हे रान सोडून खाणार काय?- गोविंद डामसे, ज्येष्ठ नागरिक, पदरवाडी.
पदरवाडीची १३ कुटुंबं जगापासून अलिप्त
By admin | Published: July 05, 2017 2:35 AM