पुणे: मिलिटरीमध्ये सिव्हिलियन म्हणून काम करत असल्याचे सांगून फिर्यादी यांच्या दोन्ही मुलींना साहेबांच्या मध्यस्थीने नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने नोकरी लावण्याच्या बहाण्याने अनेकांची एकूण १३ लाखांची फसवणूक केली आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२२ ते जुलै २०२३ या कालावधीत कोंढवा परिसरात घडला आहे.
याप्रकरणी रामदास माणिकराव देवर्षे (५२ रा. शंकर रुक्मीणी अपार्टमेंट, कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर फिर्यादीवरून गणेश बाबुलाल परदेशी (रा. एनआयबीएम रोड, कोंढवा खुर्द) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवर्षे यांनी फसवणुकीसंदर्भात कोंढवा पोलिसांकडे केलेल्या अर्जाची चौकशी करून पोलिसांनी शनिवारी (२५ नोव्हेंबर) गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश परदेशी याने फिर्यादी रामदास देवर्षे यांना तो स्वत: मिलिटरी मध्ये सिव्हिलियन म्हणून नोकरी करत असल्याचे सांगितले. तसेच विधान भवन कौन्सिल हॉल पुणे येथे कायमस्वरुपी नोकरी करत असल्याचे सांगून त्याठिकाणी शिक्षण झालेल्या मुलांना साहेबांच्या मध्यस्थीने नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. परदेशी याने देवर्षे यांच्या दोन मुलींना नोकरी लावण्याचे आश्वासन देऊन त्यासाठी प्रत्येकी तीन लाख रुपये खर्च असल्याचे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून देवर्षे यांनी मुलींना नोकरी लावण्यासाठी आरोपीला वेळोवेळी रोख व ऑनलाईन स्वरुपात पाच लाख रुपये दिले.
यानंतर गणेश परदेशी याने गॅरिसन इंजिनिअर जी. ई. (एन) पुणे या नावाने बनावट शिक्के तयार केले. त्यावर एस ओ.२ डायरेक्टर बोर्डाचे ऑफिसर एस. के. जैन यांची बनावट सही करुन जॉयनिंग लेटर देखील दिले. आरोपी परदेशी याने देवर्षे यांच्या मुलींना नोकरी न लावता फसवणूक केली. तसेच देवर्षे यांच्यासह परदेशी याने इतरांकडून ८ लाख ३२ हजार रुपये घेऊन त्यांची देखील आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत.