पुणे : पाल्याचे अॅडमिशन आरटीई कोट्यातून करुन देतो, असे सांगून स्वत:च्या खात्यात पैसे जमा करुन घेऊन अकाऊंटंटने पालकांची १३ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत स्वानंद चंद्रकांत कुलकर्णी (रा. वाघोली) यानी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विनयकुमार रुपचंद भांडारकर (रा. मांजरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वाघोली येथील पोदार इंटरनॅशनल स्कुलमध्ये एप्रिल २०२३ ते ४ नोव्हेबर २०२३ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकाच शाळेमध्ये काम करतात. विनयकुमार हा अकाऊंटंट आहे. शाळेत मुलाच्या प्रवेशासाठी आलेल्या पालकांना पाल्याचे अॅडमिशन आरटीई कोट्यांमधून करुन देतो, असे विनयकुमार याने सांगितले. अशा प्रकारे ५३ पालकांकडून विनयकुमार याने रोख किंवा माझ्या अकाऊंटवर ऑनलाईन जमा करा, मी शाळेच्या खात्यामध्ये पैसे भरतो, अशी वेगवेगळी कारणे सांगून शाळेची तसेच पालकांची एकूण १३ लाख ६५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. शाळेच्या बँक खात्याची तपासणी केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे तपास करीत आहेत.