पिंपरी : जमावबंदी व संचारबंदीचे उल्लंघन करून एका इमारतीच्या टेरेसवर एकत्र येऊन नमाज पठण केल्याचा प्रकार समोर आला आहे. कुदळवाडी, चिखली येथे शुक्रवारी (दि. २७ ) हा प्रकार घडला. याप्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या इतर २० ते २५ साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समीना सराईतुल्ला वारीसअली चौधरी, अकबाल हाकीबुल्ला खान (वय ५२), सलीम झीनत चौधरी (वय 32), महंमद शकील महमद खलील चौधरी (वय ४६), कमल हयातुल्ला रहमाणी (वय ४८), शमशुद्दीन महंमद इलाके खाल (वय ४५), नशीबउल्ला महंमद जमा (वय ५८), अफजल अमीरउल्ला चौधरी (वय ३७), अहमद हुसेन समीउल्ला चौधरी (वय २८), मोहमद साकीर समीना सराईतुल्ला चौधरी (वय १८), बिलाल महंमद शकील चौधरी (वय २०), सोएल महंमद शकील चौधरी (वय २०), जैनुद्दीन शमशुद्दीन खान (वय १८, सर्व रा. कुदळवाडी, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांच्यासह त्यांच्या २० ते २५साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संतोष बिभीषन सपकाळ यांनी चिखली पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. २७) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेले रुग्ण आढळत आहेत. त्यासाठी या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक धार्मिक स्थळावर पूजाअर्चा, प्रार्थना करण्यास एकत्र येण्यास मनाई आदेश देण्यात आले आहेत. असे असतानाही आरोपी यांनी गर्दी केली. यातून आजाराचा इतरांना संसर्ग होण्याची होण्याची माहिती असतानाही शासनाच्या विविध आदेशांचे उल्लंघन केले. त्यामुळे आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम 188, 269, साथरोग प्रतिबंध अधिनियम कलम 3 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 57 प्रमाणे पोलीस कर्मचारी संतोष सपकाळ यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.