पुणे : घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे मुठा आणि मुळा नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने जिल्ह्यातील काही ठिकाणी पूरस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे शहर, पिंपरी चिंचवड आणि बारामती, दौंड तालुक्यातील ३ हजार ३४३ कुटुंबातील १३ हजार ३३६ व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. स्थलांतरीतांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर संबंधितांच्या घरांचे पंचानामे करुन त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी सांगितले. जिल्ह्यात झालेल्या अतीवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख या वेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राम म्हणाले, धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने पिपंरी-चिंचवड आणि पुणे शहरातील नदीलगतच्या झोपडपट्ट्या आणि सोसायट्यांमधे पाणीशिरले होते. त्यामुळे येथील नागरिकांना स्थलांतरीत करावे लागले. जिल्ह्यातील ३,३४३ कुटुंबातील १३,३३६ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यातील बारामती तालुक्यातील ५० आणि दौंड मधील१०० कुटुंबे आहेत. सर्वाधिक बाधित पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील आहेत. या स्थलांतरीतांना जवळच्या शाळा आणि समाज मंदिरामधे हलविण्यात आले आहे. वाकडच्या सूर्या हॉस्पिटलमधील ५० रुग्ण आणि १२० कर्मचाऱ्यांना देखील सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. हवामान विभागाने रविवारी अतिवृष्टीचा इशारा दिला होता. तर, पुढील दोन दिवस जोरदार वृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर तुलनेने कमी झाला आहे. अशीच स्थिती राहिल्यास पाण्याचा विसर्ग आटोक्यात राहील. त्यामुळे तूर्तास या पेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता नाही, असे राव यांनी दिली. ---------------------बंडगार्डन येथे १ लाख ८० हजार क्युसेकची धोक्याची पातळी आहे. सध्याची स्थिती पाहता १ लाख ४० हजार क्युसेकपेक्षा अधिकपाण्याचा विसर्ग होणार नाही. पाणीपातळी ही धोक्याच्या खालीच राहील. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. नवल किशोर राम, जिल्हाधिकारी--------------------चार तालुके अजूनही रितेचवेल्हे, मावळ, मुळशी या घाटमाथ्यांवर जोरदार पाऊस होत असला तरी जिल्ह्यातील इंदापूर (३१ टक्के), दौंड (४०टक्के), बारामती (५८टक्के) आणि शिरुर (५९टक्के) तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. मावळला सरासरीच्या दोनशे टक्के, मुळशी १३४, भोर १४१, जुन्नर १४७ आणि खेडला १३९ टक्के पाऊस झाला आहे.
जिल्ह्यातील १३ हजार जणांना हलविले सुरक्षित स्थळी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 4:53 PM
शहर, पिंपरी चिंचवड आणि बारामती, दौंड तालुक्यातील ३ हजार ३४३ कुटुंबातील १३ हजार ३३६ व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
ठळक मुद्देशहरात अधिक बाधित : पूराचे पाणी ओसरल्यावर करणार पंचनामे