टाकळी हाजी : महसूल विभाग ‘लोकमत’च्या दणक्याने खडबडून जागा झाला आहे. तहसीलदार रणजित भोसले यांनी स्वत: कारवाईची मशाल स्वत:च्या खांद्यावर घेत वाळूचे १३ ट्रक पकडून कारवाईचा धडाका लावल्याने वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहेत.शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूउपसा सुरू आहे. त्यामुळे रस्ते खराब झाले तर आहेतच, मात्र वाळूतस्करांची गोरगरीब जनतेवर प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे ‘लोकमत’ने आवाज उठविला. त्यावर तहसीलदार रणजित भोसले यांनी धडक कारवाई करण्यास सुरुवात केली. तालुक्यातील चोरटी वाहतूक शिक्रापूरमार्गे पुण्याला जाते. त्यामुळे पहाटे साडेचार वाजल्यापासून महसूलची यंत्रणा गाड्या पकडण्यासाठी सज्ज झाली होती. वाळूच्या गाड्या निघोज-दाणेवाडी-कवठे येमाई-टाकळी हाजी-आणापूर-निमगाव म्हाळुंगी या गावातून येतात. त्यामुळे तहसीलदार भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिक्रापूर येथे सापळा लावून अवघ्या काही तासांतच दहा गाड्या पकडण्यात यश आले. निघोज (ता. पारनेर) येथून गाड्या भरून टाकळी हाजीमार्गे जात असल्यामुळे कुंड रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात अण्णापूर येथेसुद्धा मोठी तस्करी होत असून येथील अनेक ट्रक दमदाटी करत वाहतूक करत असतात.तहसीलदार भोसले यांनी कारवाईची धार जोर धरू लागल्याने तस्करांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. लोकमतच्या दणक्यानंतर तहसीलदारांनी टाकळी हाजी येथे मोठी कारवाई केली. त्यामध्ये एक जेसीबी, ट्रॅक्टर पकडण्यात आला. मात्र संबंधित तस्करांनी परिसरातील गोरगरीब जनतेला दमदाटी करून बघून येतो, म्हणत दहशत माजविण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. ‘चोराच्या उलट्या बोंबा’ अशी परिस्थिती वाळूतस्करांची झाली आहे. तहसीलदारांनी यापुढेही अशीच कारवाई सुरू ठेवावी, हीच जनतेची मागणी आहे. तसेच दहशत करून वाळूचोरी करणाºया तस्करांवर गुन्हा दाखल होण्याची गरज आहे.
वाळूवाहतूक करणारे १३ ट्रक पकडले, महसूल विभागाचा कारवाईचा धडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 2:18 AM