लोणावळा : मागील एक वर्षापासून अल्पवयीन मुलीला फुस लावून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी लोणावळ्यातील एका 40 वर्षीय इसमाला लोणावळा शहर पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरज दिगंबर कारंडे (वय 40 वर्षे सध्या रा. निसर्ग नगरी सोसायटी, लोणावळा. मूळ राहणार कैलास नगर, लोणावळा) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने त्याच्या घरात भाडेकरू म्हणुन ठेवलेल्या एका अनुसुचित जाती जमातीतील 13 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर मागील एक वर्षापासुन वेळोवेळी बलात्कार केला आहे. त्याबाबत पीडित मुलीच्या आईने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल माणिक आहिनवे व आजिज मेस्त्री यांनी आरोपीला ताब्यात घेत अटक केली.
ह्या गुन्हयात अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा लावण्यात आल्याने गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहायक पोलीस अधीक्षक नवनीत कुमार कॉवत हे करत आहेत.