बारामती - घरासमोर सायकल चालवणाऱ्या 13 वर्षीय मुलाला भरधाव वेगाने जाणाऱ्या मद्यपी कारचालकाने चिरडल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी (8 नोव्हेंबर) रात्री साडेदहाच्या सुमारास बारामती शहरातील कसबा भागात ही घटना घडली. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी तोडफोड केली आहे. तसेच कारमधील तीन मद्यपींना बेदम चोप दिला. शहर पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. त्यामध्ये पणदरे (ता. बारामती) येथील सराफ व्यावसायिकाचा समावेश आहे.
शहर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साकीब गालीब सय्यद (13) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. तर अमीर शौकत सय्यद (35) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कारचालक गणेश पोपटराव शहाणे (33), सोमनाथ अनिल लोळगे (33), जितेंद्र गणपतराव भोसले तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये लोळगे सराफ व्यावसायिक आहे. स्वीफ्ट कार (क्रमांक एमएच 42/ के 9997) मधील तीन आरोपींनी मद्यपान केले होते. त्यांच्या कारमध्ये दारूच्या बाटल्या, काचेचे ग्लास सापडले आहेत.साकिब हा शनिवारी रात्री घरासमोर सायकल खेळत होता. यावेळी वडिलांनी त्याला रात्रीचे 10 वाजले आहेत. सायकल लावून घरात ये, असे सांगितले. त्यावर तो घरासमोर येवून सायकल लावत होता. याच वेळी भरधाव वेगावे आलेल्या मद्यधुंद कारचालकाने साकिब यास अक्षरश: फरपटत नेले. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. वेग आवरता न आल्याने साकिब यास फरपटत नेऊन पाचसहा वेळा कार पलटी झाली.
अपघातानंतर पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंडे करीत आहेत.घटनेनंतर संतप्त नागरिकांनी कारची तोडफोड केली. कारचालकासह कारमधील अन्य मद्यपींना चोप दिला. तसेच कारची तोडफोड केली. साकिब हा शहरातील राधेश्याम एन. आगरवाल टेक्नीकल हायस्कूलमध्ये इयत्ता ८ वीमध्ये शिक्षण घेत होता. त्याचे वडील टुरिस्ट कारचालक आहेत. त्याच्या मागे आई वडील दोन बहिणी असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूमुळे कसबा, साठेनगर परिसरात शोककळा पसरली आहे.