पुणे : वाढते शहरीकरण, वाहनांचा धूर आणि औद्योगिक विस्तारामुळे वाढलेले हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने ‘नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम’ जाहीर केला आहे. पहिल्या टप्प्यात सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या देशातील १०६ शहरांची निवड केली असून, यात पुण्यासह राज्यातील सतरा शहरांचा समावेश आहे.
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम अंतर्गत पुणे शहराला १३५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी ही माहिती दिली. नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम अंतर्गत सूक्ष्म धूलिकणांचे (पार्टिक्युलेट मॅटर १०) आणि अतिसूक्ष्म धूलिकणांचे (पीएम २.५ मायक्रॉन व्यासाचा घातक सूक्ष्मकण) प्रमाण २०२४ पर्यंत २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेने विविध उपाय सुरू केले आहेत.
याअंतर्गत अनेक ठिकाणी कारंजी उभी केली जाणार आहेत. त्यामुळे धूलिकणांचे प्रमाण नियंत्रित राहील. याशिवाय स्मशानभूमींमध्ये विद्युतदाहिन्या, गॅसदाहिन्यांची संख्या वाढविणे, तिथून शुद्ध हवाच बाहेर पडावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शहरातील विद्युत वाहनांची संख्या वाढविणे, वाहतूक कोंडी कमी करणे, रस्ते सफाईच्या कामात सुधारणा, सार्वजनिक वाहतुकीच्या अधिकाधिक वापरास प्रोत्साहन, मेट्रोसाठी फीडर सेवा म्हणून ३०० मिडी बसची खरेदी आदी उपाययोजनाही केल्या जातील, असे आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितले.
..तर आणखी निधी मिळेल
सध्या तीन वर्षांसाठी १३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कालावधीत महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली तर प्रोत्साहन म्हणून अधिक निधी उपलब्ध होऊ शकतो.
उपाययोजनांबाबत सादरीकरण :
शहरातील प्रदूषण कमी करून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम अंतर्गत पुणे शहराला १३५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीतून शहरात सूक्ष्म व अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचे सादरीकरण केंद्र सरकारसमोर केले असून, हे प्रयत्न यशस्वी झाल्यास केंद्राकडून आणखी निधी मिळू शकेल.