लाेकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वृक्ष गणनेनुसार सन २०२०-२१ मध्ये शहरात प्रतिमाणसी १.३९ वृक्ष असून शहरातील एकूण वृक्ष संख्या ही ४७ लाख १३ हजार ७९१ इतकी आहे़ यामध्ये ४२९ प्रजाती, १२४ दुर्मीळ वृक्षे आहेत़ शहरात २०४ उद्याने असून, या उद्यानांचे एकूण क्षेत्रफळ २१ लाख ९१ हजार ५०४ चौरस मीटर आहे़
महापालिकेच्या पर्यावरण अहवालात महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत असणारे ३३़०१ हेक्टर क्षेत्रफळ असलेले गणेशखिंड उद्यान हे शहरातील पहिलेच जैवविविधता वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. याचबरोबर शहराच्या पूर्व भागातील कवडीपाठ या ठिकाणी २४० तर एआरएआय टेकडीवर २४८ आणि पाषाण तलाव परिसरात २२७ जातींचे विविध पक्षी आढळून आले आहेत़ पक्ष्यांची नैसर्गिक अधिवास असलेलेली ही तीन ठिकाणे सर्वाेत्तम हॉटस्पॉट म्हणून सन २०२०-२१ मध्ये नोंदविण्यात आली आहेत़
-------------------
शहरात १ हजार १५२.१० मिमी पावसाची नोंद
शहरात सन २०२० मध्ये सर्वात जास्त तापमान २० मे, २०२० रोजी ४०.६ डिग्री सेंटीग्रेड व सर्वात कमी तापमान २२ डिसेंबर, २०२० रोजी ८.१ डिग्री सेंटीग्रेड इतके नोंदविले गेले आहे़ सन २०२० मध्ये शहरात एकूण १ हजार १५२ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत आयोजित केलेल्या ‘क्लायमेट स्मार्ट सिटीज अस्सेसमेंट फ्रे मवर्क २.०’ मध्ये ४ स्टार रेंटिंगसह पुणे शहराने देशातील इतर ८ शहरांसह सर्वाधिक रेटिंग मिळवून पहिल्या लीगमध्ये स्थान प्राप्त केले आहे़
------------------
कचऱ्यावर ‘सायंटिफिक कँपिंग’ करण्यात यश आल्याचा दावा
सन २०२०-२१ मध्ये शहरातील ५० एकर जागेवरील कचऱ्यावर सायंटिफिक कँपिंग करण्याचे काम पूर्ण झाल्याचे तसेच बायो-मायनिंग प्रकल्पांतर्गत २० एकर जागेवरील ९ लाख टन कचऱ्यापैकी ५.७५ लाख टन कचऱ्यावरील काम पूर्ण झाल्याचा दावा पर्यावरण अहवालात करण्यात आला आहे़ शहरातील ८ लाख ५० हजार मिळकतींमधून स्वच्छ या संस्थेच्या माध्यमातून दररोज ओला व सुका कचरा स्वतंत्ररित्या संकलित करण्यात येत असल्याचेही महापालिकेने सांगितले आहे़ शहरात बायो-मिथेनायझेशन, वेस्ट टू एनर्जी, इंसिनरेश्नसारखे प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्यात येत असून, ई-वेस्ट, बायो-मेडिकल वेस्ट, गार्डन वेस्ट स्वतंत्रपणे संग्रहित करण्यात येत असल्याचा दावाही पर्यावरण अहवालाद्वारे महापालिकेने केला आहे़