बारामती (पुणे) :बारामती शहरातील जिल्हा क्रीडा संकुलालगत शहरातील देसाई इस्टेट व परिसरात गुरुवारी (दि. १७) पहाटे चोरट्यांनी सुमारे १४ सदनिका फोडल्या. एकाच वेळी एवढ्या मोठ्या सदनिकांमधून चोरी होण्याची ही पाहिलीच वेळ आहे. या सदनिकांमधून २२ तोळ्याहून अधिक दागिने लंपास करण्यात आले आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. यातील बहुतांश सदनिका बंद होत्या.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १७) पहाटे तीन ते चारच्या दरम्यान हा प्रकार घडला. देसाई इस्टेट व जिल्हा क्रीडा संकुलालगतच्या पाच अपार्टमेंटमधील सदनिका चोरट्यांनी फोडल्या. त्यासाठी पाच ते सहा जणांची टोळी मोटारीने या भागात आली. चोरट्यांनी सदनिकांचे कुलूप, कडी-कोयंडे तोडून टाकत दागिन्यांची चोरी केली. मागील आठवड्यात याच परिसरात दोन चोऱ्यांचे प्रकार घडले होते. चोरी झालेल्या अनेक सदनिका बंद होत्या. एकाच सदनिकेतून २२ तोळ्यांहून अधिक दागिने चोरीला गेले आहेत. अन्य सदनिकांमधूनही दागिने, रोकड चोरीला गेली आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे. घटनेनंतर अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
...खासदार सुळेंची अधीक्षकांना मागणी
बारामती शहरातील जिल्हा क्रीडा संकुलाजवळच्या १४ सदनिका फोडून चोरट्यांनी मोठी रक्कम व दागिने चोरी केले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुणे ग्रामीण अधीक्षकांनी या घटनेची तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. याबाबत सुळे यांनी ट्वीट केले आहे.
चोरीची घटना आणि चोरीसाठी वापरलेले वाहन सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. गुन्ह्यासाठी वापरलेले वाहन निष्पन्न झाल्याने आरोपींपर्यंत लवकरात लवकर पोहोचणे शक्य होईल. चोरी झालेल्या ठिकाणी भेट देत तेथील नागरिकांशी चर्चा केली. त्या आधारे चोरीचा गुन्हा लवकरच उघड होईल.
- आनंद भोईटे, अप्पर पोलिस अधीक्षक, बारामती