लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कुणी आई बोलल्याचा राग मनात धरून, कुणी घरात भांडण करून तर, कुणी पुण्यात राहण्यास निवारा नाही म्हणून अशा नानाविध कारणांनी पुणे स्थानकावर बेवारसपणे फिरताना मे महिन्यात १४ अल्पवयीन मुले आढळून आली. रेल्वे पोलीस बलाच्या (आरपीएफ) सतर्कतेमुळे या मुलांना पुन्हा पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
विशेष म्हणजे मे महिन्यात लॉकडाऊन असूनही ही मुले पुणे स्थानकापर्यंत पोहोचली. ही सगळी ९ ते १२ वयोगटातील मुले आहेत. इतर जिल्ह्यांतून तर काही परराज्यांतून ही मुले रेल्वेने पुण्यात आली. काही ट्रक, टेम्पो आदी वाहनांतून पुण्यात आली. पुण्यात पोहोचल्यावर आसऱ्यासाठी ही मुले पुणे रेल्वे स्थानकाच्या छताखाली आली. येथे बेवारसपणे फिरताना त्यांनी आरपीएफने ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करून त्याच्या पालकांना बोलावून योग्य ती कार्यवाही करून पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
पुणे स्थानकावर देशभरातून रेल्वेगाड्या येत असल्याने अल्पवयीन मुले सापडण्याचे प्रमाण अधिक आहे. या संदर्भात आरपीएफच्या ‘सावित्रीबाई फुले’ या विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. ह्या पथकातील दीपाली जावकर रेल्वे स्थानकावर गस्त घालत असताना त्यांना काही मुले भेदरलेल्या अवस्थेत तर, काही रडवेल्या अवस्थेत नजरेस पडली. त्यांची आस्थेने चौकशी करून त्यांना खायला देऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचे काम जावकर यांनी केले.
त्यानंतर त्यांच्या पालकांशी संपर्क साधून या मुलांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यात आले. अगदी किरकोळ कारणांवरून डोक्यात राख घालून घेत ही मुले घर सोडून येतात ही चिंतेची बाब आहे, असे निरीक्षण जावकर यांनी नोंदवले.