पुणे : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून, २५ धरणांपैकी सुमारे १४ धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे उजनी धरणात जाणाऱ्या पाण्याच्या विसर्गात मोठी वाढ झाली असून, दोनच दिवसांत उजनीचा पाणीसाठा प्लसमध्ये आला आहे. उजनी धरणात दिवसभरात दीड टीएमसीपेक्षा अधिक पाणी आले असून, आजअखेर ०.९८ टीएमसी उपयुक्त साठा जामा झाला आहे. यामुळे पुण्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.धरणांच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये सध्या धुवाधार पाऊस सुरु आहे. यामुळे पानशेत, मुळशी, चासकमान, पवना, गुंजवणी, येडगाव या प्रमुख धरणांसह १४ धरणे शंभर टक्के भरली आहेत. यामुळे धरणांमधून हजारो क्युसेक्सने पाणी नद्यांमध्ये सोडण्यात येत असून, अनेक नद्या दुथडी भरून वाहात आहेत. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात आज अखेर २६.२९ टीएमसी म्हणजे ८९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तर पिंपरी-चिंचवड शहरासाठी महत्त्वाचे असलेल्या पवना धरणात आजअखेर ७.६७ टीएमसी ९०.१२ टक्के पाणी आले आहे.कुकडी प्रकल्पातील धरणे फुल्लनारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या पाच धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठा सरासरी ७८.३७ टक्के झाला आहे. येडगाव धरण ९३.२ टक्के, वडज धरण ८९.७८ टक्के, तर डिंभे धरण ९४.१९ टक्के भरलेले आहे़ या धरणांमधून कुकडी व मीना नदीला, तसेच कालव्याद्वारे विसर्ग सुरू आहे़, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्ऱ. १ नारायणगावचे कार्यकारी अभियंता जी. बी. नन्नोर यांनी दिली.जुन्नर तालुक्यात दि़ ३ आॅगस्टपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे़ या पावसामुळे कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या सहा धरणांपैकी पाच धरणांमध्ये ७८.३७ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे़ यामध्ये डिंभे, येडगाव व वडज ही तीन धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरली आहेत. माणिकडोह व पिंपळगाव जोगा ही धरणेही अनेक वर्षांनंतर पूर्ण क्षमतेने भरतील, अशी परिस्थिती आहे़ येडगाव धरणात उपयुक्त पाणीसाठा २६०५ द़ ल़ घ़ फूट (९३.०२ टक्के) आहे. या धरणातून ४४१२ क्युसेक्स वेगाने कुकडी नदीत विसर्ग सुरू आहे़ तर १३१५ क्युसेक्स वेगाने कालव्यात विसर्ग सुरू आहे. कुकडी डावा कालव्यातून ४५ कि.मी.पर्यंत पाणी पोहोचलेले आहे़ वडज धरणात उपयुक्त पाणीसाठा १०१५ द़ ल़ घ़ फूट (८९.७८ टक्के) आहे. या धरणातून २,७२२ क्युसेक्स वेगाने मीना नदीत, तर ३५७ क्युसेक्स वेगाने कालव्यात विसर्ग सुरू आहे़ माणिकडोह धरणात उपयुक्त पाणीसाठा ५५३७ द़ ल़ घ़ फूट (५४.४९ टक्के) आहे़ या धरणात ५ टीमसीपेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे़ पिंपळगाव जोगा धरणात उपयुक्त पाणीसाठा २९८२ द़ ल़ घ़ फूट (७६.६५ टक्के) आहे़ डिंभा धरणात उपयुक्त पाणीसाठा ११७५८ द़ ल़ घ़ फूट (९४.१९ टक्के) आहे़ चिल्हेवाडी धरणात उपयुक्त पाणीसाठा ६४६ द़ ल़ घ़ फूट (७४.३८ टक्के) आहे़ या धरणातून ५७७८ क्युसेक्स वेगाने येडगाव धरणात विसर्ग सुरू आहे़ डिंभे : धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात दररोज १६ हजार क्युसेक्सने पाणी जमा होत आहे. चारच दिवसांत धरणात ९४ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे आज सकाळी ११.३० वाजता डिंभे धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले असून, जवळपास ४५०० क्युसेक्सने धरणातून पाणी सोडण्यात येत होते. दुपारी तीन वाजता यात पुन्हा वाढ करण्यात आली असून, सुमारे ९ हजार क्युसेक्सने धरणातून विसर्ग सुरू आहे. यामुळे घोड नदीपात्रात पूरस्थिती निर्माण झाली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील १४ धरणे ओव्हरफ्लो
By admin | Published: August 07, 2016 4:06 AM