शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास केले जात नाही. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थी पुढील वर्गात जातात. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश देण्याचे जाहीर केले. तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने सुद्धा याबाबत मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या. मात्र, विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने, तसेच दूरचित्रवाणी संचावर उपलब्ध करून दिलेल्या विविध कार्यक्रमांच्या आधारे अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ज्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला अशा विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेणे गरजेचे होते. अशी अपेक्षा काही पालकांनी व्यक्त केली आहे. मात्र, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करणे शक्य होत नसल्याने या विद्यार्थ्यांसाठी ब्रिज कोर्स करावेत, असे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
------------
आरटीईनुसार विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाद्वारे उत्तीर्ण केले जाते. यंदा शाळा उघडल्या नाहीत. त्यामुळे मूल्यमापन घेताच आले नाही. परिणामी, सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. मूल्यमापनाविना उत्तीर्ण केल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक अवमूल्यन होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षात सुरुवातीच्या दोन महिन्यांमध्ये मागील वर्षाच्या अभ्यासक्रमाची उजळणी घेऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करावे. त्यानंतर त्यांना उत्तीर्णतेचे प्रगतिपत्रक दिल्यास शैक्षणिक हिताचे राहील.
- गोविंद नांदेड, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
----------------------
ऑनलाइन शिक्षण १०० टक्के विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. तसेच, वर्षभर एकही विद्यार्थी वर्गात येऊ शकला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे अडचणीचे झाले आहे. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्यांना वरच्या वर्गात पाठवणे हा निर्णय योग्य आहे. मात्र, पुढील वर्गात जाण्यापूर्वी या विद्यार्थ्यांसाठी ब्रिज कोर्स तयार करणे आवश्यक आहे.
- एन. के. जरग, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
----------------
शाळा बंद असल्या, तरी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. पालकांनीही वर्षभर विद्यार्थ्यांची आवश्यक तयारी करून घेतली. बहुतेक शाळांनी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाइन मूल्यमापन करून त्यांना पुढील वर्गात पाठवणे अपेक्षित होते.
- सुवर्णा सूर्यवंशी, पालक
--------------------
बहुतेक शाळांनी ऑनलाइन मूल्यमापन केले होते. विद्यार्थी व पालकही याबाबत समाधानी होते. त्यामुळे ऑनलाइन परीक्षांच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून घ्यावे, असा निर्णय शासनाने देणे अपेक्षित होते.
- मनोज केदारे, पालक,
--------------
जिल्ह्यातील शाळांमध्ये पहिली ते आठवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी
तालुका विद्यार्थी संख्या
आंबेगाव २५,८५३
बारामती ५८,७९४
भोर १८,९३१
दौंड ५१,५६८
हवेली २,३६,४७
इंदापूर ५६,०९४
जुन्नर ४७,८६७
खेड ७९,७७९
मावळ ५९,८५६
मुळशी ४७,२८२
पुरंदर २८,६७७
शिरूर ६५,८१८
वेल्हा ४,६३१
औंध १,०३,४८२
येरवडा ७४,८००
बिबवेवाडी ९६०२१
हडपसर १,०६,८९५
पुणे शहर ४४,४२५
पिंपरी १,१८,६७३
आकुर्डी १,५९,१७८
---------------
एकूण १४,८२,२७०