पुणे : कोरोनामुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर किंवा मैदानावर जाऊन खेळता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम झाला आहे. तसेच गेल्या दोन वर्षांत विद्यार्थी मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम होऊ शकले नाहीत. त्यातच राज्यातील सुमारे १४ टक्के शाळांना खेळाचे मैदानच नाही. त्यामुळे या शाळांंमधील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत नाही, अशी भावना क्रीडाशिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.
राज्य शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालामध्ये राज्यातील केवळ ८६.४६ टक्के शाळांकडेच क्रीडांगण असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण शाळांपैकी केवळ ८१ टक्के शाळांकडेच मैदान असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच, ९५ टक्के खासगी अनुदानित शाळांकडे क्रीडांगण असून, ९३ टक्के विना अनुदानित शाळांकडे मैदान आहे. परिणामी, खासगी व विना अनुदानित शाळांच्या तुलनेत शासकीय शाळांकडे मैदान नसल्याचे दिसून येत आहे.
----------
क्रीडांगण असलेल्या राज्यातील एकूण शाळा : ९५,३०६
क्रीडांगण असणाऱ्या शासकीय शाळा : ५३,६३५
क्रीडांगण असणाऱ्या खासगी अनुदानित शाळा : २२,६१६
क्रीडांगण असणाऱ्या खासगी विनाअनुदानित शाळा : १८,३६०
----
राज्यातील अनेक शाळांना क्रीडांगण नाही. त्यामुळे खेळाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळेच खेळाच्या दर्जात अद्याप सुधारणा झालेली नाही. शासकीय क्रीडांगण भाडेतत्त्वावर दिले जाते. त्यामुळे केवळ श्रीमंत घरातील विद्यार्थीच पैसे भरून खेळाचा सराव करतात. गरीब विद्यार्थ्यांना गुणवत्ता असूनही नाईलाजास्तव खेळणे सोडावे लागते.
- फिरोज शेख, क्रीडा संचालक, एसएनबीपी स्कूल
------------
कोरोनामुळे विद्यार्थी घराबाहेर पडू शकले नाहीत. त्यामुळे सध्या अनेक विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास झाल्याशिवाय त्यांचा सर्वांगीण विकास होत नाही. त्यात क्रीडांगण नसल्याने विद्यार्थ्यांच्या विकासात मर्यादा येतात.
- निवृत्ती काळभोर, समन्वयक, क्रीडा शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य
------------