PDCC Bank Election: जिल्हा बँकेच्या 14 जागा बिनविरोध; आता 7 जागांसाठी निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 08:12 PM2021-12-22T20:12:42+5:302021-12-22T20:29:58+5:30
बिनविरोध निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी तडजोडी झाल्या...
पुणे: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Pune District Central Cooperative Bank Election) संचालक मंडळ निवडणुकीत संचालकांच्या 21 जागांपैकी 14 जागा बिनविरोध झाल्या. आता 7 जागासाठी 2 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी विद्यमान संचालक राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार दिलीप मोहिते, विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात , संजय काळे आप्पासाहेब जगदाळे विरोधकांची समजूत काढण्यात यशस्वी झाले.तर आता खरी लढत हवेली, मुळशी आणी शिरूर तालुक्यातील अ वर्ग सोसायटी गटात होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या राजकारणात केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक चांगलीच गाजत आहे. जिल्ह्यातील सर्व मंत्री व बहुतेक सर्व आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने अधिक रंगत वाढली आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण 132 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात 14 उमेदवार उरले आहेत. शेवटच्या दिवशी तब्बल 52 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधातील उमेदवाराने आज सकाळी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भरणे हे सहाव्यांदा बँकेवर संचालक झाले आहे.
बिनविरोध निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी तडजोडी झाल्या. इंदापूर तालुक्यातून भाजप पुरस्कृत आप्पासाहेब जगदाळे हेदेखील बिनविरोध निवडून आले. जुन्नर मध्ये अखेरच्या क्षणी रघुनाथ लेंडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने संजय काळे यांचा मार्ग मोकळा झाला. मावळमध्ये भोईरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता. या निर्णयाच्या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान देऊन अर्ज अवैध ठरला होता परंतु अखेरच्या क्षणी त्यांनी देखील माघार घेतल्यामुळे मावळमधून ज्ञानोबा दाभाडे हे बिनविरोध निवडून आले.
सहा आमदार बिनविरोध
अशोक पवार यांना मात्र लढावे लागणार..
जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमध्ये मंत्री राज्यमंत्री यांच्यासह सहा आमदार बिनविरोध निवडून आले परंतु शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार यांना मात्र निवडणुकीमध्ये लढत द्यावी लागणार आहे त्यांच्या विरोधात आबासाहेब गव्हाणे हे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत.
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार
उपमुख्यमंत्री अजित पवार- बारामती, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील - आंबेगाव, आमदार संग्राम थोपटे -भोर, रमेश थोरात -दौंड, अप्पासाहेब जगदाळे -इंदापूर ,संजय काळे -जुन्नर, आमदार दिलीप मोहिते- खेड, ज्ञानोबा (माऊली) दाभाडे- मावळ ,आमदार संजय जगताप -पुरंदर, रेवणनाथ दारवटकर- वेल्हे ब वर्ग राज्यमंत्री दत्तात्रय भरणे इंदापूर, अनुसूचीत जाती जमाती प्रवीण शिंदे हवेली, इतर मागास प्रवर्ग संभाजी होळकर बारामती, भटक्या विमुक्त जाती जमाती दत्तात्रय येळे, बारामती. यांचा समावेश आहे
अशी होणार लढत....
हवेली तालुका- प्रकाश म्हस्के विकास दांगट मुळशी तालुका- आत्माराम कलाटे ,सुनील चांदेरे शिरूर तालुका- आमदार अशोक पवार, आबासाहेब गव्हाणे क वर्ग बँका पतसंस्था- प्रदिप विद्याधर कंद ,सुरेश घुले, दिलीप मुरकुटे.
ड वर्ग- दादासाहेब फराटे दिगंबर दुर्गाडे. महिला- (दोन जागा) आशाताई बुचके, निर्मला जागडे, पूजा बुट्टे पाटील