पुणे : अवघ्या चौदा वर्षांच्या मुलाला घेऊन त्यांनी गाव सोडले. त्याला उपचार मिळतील, या आशेने पुणे गाठले. पण, पुण्यात आल्यावर कुठेच बेड मिळेना. असाह्य झालेल्या आईवडिलांनी जम्बो कोविड सेंटरमध्ये धाव घेतली. मुलावर उपचार करण्याची आर्जवे केली. मुलाची अवस्था गंभीर होती. परंतु, डॉक्टरांनी त्याला दाखल करून घेण्याचा निर्णय घेतला. आठवड्याभराच्या उपचारांनंतर हा मुलगा ठणठणीत बरा झाला आहे.
पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार: आदित्य सोनवणे (वय १४) या मुलाला घेऊन त्याचे आईवडील पुण्यात आले होते. त्याला कोरोना झालेला होता. आर्थिक परिस्थिती जेमतेमच असलेल्या आईवडिलांनी पुण्यातील जवळपास सगळ्या रुग्णालयात जाऊन त्याला उपचारांकरिता दाखल करून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना पुण्यात कुठेच बेड उपलब्ध झाला नाही. शेवटी त्यांनी जम्बो कोविड सेंटरमध्ये जाऊन मुलाला दाखल करून घेण्याची विनंती केली.
मुलगा लहान असल्याने दाखल करून घेतील की नाही, या भीतीने मुलाचे वय १६ सांगितले. वास्तविक जम्बो कोविड सेंटर फक्त मोठ्या माणसांकरिता आहे. याठिकाणी लहान मुलांवर उपचार केले जात नाहीत. मुलाची तब्येत अत्यंत गंभीर होती. त्याला दाखल करून घेण्यात धोका सुद्धा होता. मात्र, डॉक्टर श्रेयांश कपाले यांनी त्याला दाखल करून घ्यायचा निर्णय घेतला. त्याच्यावर जम्बोमधील ‘एचडीयु वॉर्ड’मध्ये उपचार सुरू केले. त्याची ऑक्सिजन पातळी खाली आलेली होती. १५ लिटर प्रति मिनीट या वेगाने ऑक्सिजन पुरवला जात होता. त्याच्यावर स्वतः डॉ. कपाले आणि वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रतीक कटारिया हे उपचार करीत होते. या काळात आईवडिलांची बेडसाठी बाहेर धावपळ सुरूच होती. जम्बोमधील डॉक्टरांनी केलेल्या उपचारांचा योग्य परिणाम झाला. या मुलाचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. आठ दिवसांच्या उपचारांनंतर या मुलाला रविवार घरी सोडण्यात आले.
----
जम्बो रुग्णालय मोठ्या माणसांकरिता आहे. लहान मुलांसाठी व्यवस्था नाही. मुलाची अवस्था सुद्धा गंभीर होती. आईवडिलांनी मुलाचे वय १६ सांगितले. त्याला दाखल करून घेत उपचार सुरू केले. या मुलाला वाचविण्यात यश आले.
- डॉ. श्रेयांश कपाले, जम्बो कोविड सेंटर