पुणे : आई-वडील घराबाहेर पडू देत नाहीत या कारणावरून चिडलेल्या १४ वर्षीय मुलीने चार वर्षांच्या भावासमोरच गळफास घेऊन आत्महत्या केली. खळबळ उडवून देणारी ही घटना हडपसरमधील आदर्शनगरमध्ये रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली.निकिता युवराज शिर्के (वय १४, रा. आदर्शनगर, माळवाडी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता ही रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयामध्ये आठवीमध्ये शिकत होती. तिचे वडील मार्केट यार्ड येथे टेम्पोवर काम करतात, तर आई गृहिणी आहे.तिला पंधरा दिवसांपासून दिवाळीची सुटी होती. त्यामुळे ती सतत घराबाहेर जात असे. त्यामुळे तिचे आई-वडील तिला नेहमी घराबाहेर जास्त वेळ राहू नकोस, घरामध्ये अभ्यास कर असा आग्रह करीत असत. परंतु ती आई-वडिलांच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हती. रविवारी आई-वडिलांनी कामासाठी बाहेर जाताना निकिता व तिच्या चार वर्षांच्या भावाला घरामध्ये ठेवले.आई-वडील बाहेर गेल्यानंतर निकिताने घराच्या छताला साडीच्या साह्याने गळफास घेतला. त्या वेळी तिचा छोटा भाऊ समोरच होता. या प्रकारामुळे तो पूर्णपणे हादरून गेला आहे. आई-वडील दुपारी कामावरून घरी आल्यानंतर ही संपूर्ण घटना उघडकीस आली.याबाबत पोलिसांना माहिती कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह तातडीने खाली उतरवून शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवून दिला. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.
१४ वर्षीय विद्यार्थिनीने घेतला चार वर्षांच्या भावासमोरच गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 7:15 AM