पुणे : केंद्रीय अंदाजपत्रकात सोन्याच्या दागिन्यांवर लावण्यात आलेल्या एक टक्का अबकारी कराविरोधात सराफांनी पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे मागील चौदा दिवसांत चौदाशे कोटींच्या उलाढालीवर पाणी पडले आहे. तसेच या बंदमुळे शासनाच्या तिजोरीलाही २५ ते ३० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. नुकसान सहन करूनही सराफ संघटना मात्र अबकारी कर रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहे. दरम्यान, या बंदमुळे नागरिकांना सोने-चांदी खरेदीच्या हौसेलाही मुरड घालावी लागली आहे.केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी जाहीर केलेल्या अंदाजपत्रकात सोन्याच्या दागिन्यांवर एक टक्का अबकारी कर लावला आहे. या कराला देशात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनने कडाडून विरोध केला. हा कर रद्द करण्याच्या मागणीसाठी फेडरेशनने १ मार्चपासून बंद पुकारला. त्यानुसार पुण्यासह राज्यभरातील सराफांची दुकाने बेमुदत बंद आहेत. सोमवारी या बंदचा चौदावा दिवस होता. पुणे, पिंपरी चिंचवड आणि लगतच्या भागात १७००पेक्षा अधिक सोन्या-चांदीची दुकाने आहेत. यातील एकाही दुकानाचे शटर चौदा दिवसांपासून उघडलेले नाही. फेडरेशनचे अध्यक्ष अॅड. फत्तेचंद रांका यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे व पिंपरी चिंचवड शहरात सराफी बाजारपेठेत दररोज सुमारे १०० कोटी रुपयांची उलाढाल होत असते. त्यावर सुमारे १ कोटी रुपये आयकर, सुमारे ३६ लाख रुपये व्याज, यासह एलबीटी व इतर बाबींसह सुमारे पावणेदोन ते दोन कोटी रुपये दररोजचा फटका शासनाला बसत आहे. तसेच या बंदमुळे सराफी दुकानांमधील कामगारांचे पगारही सध्या बंद आहेत. त्यांचे पगार करता येत नाहीत. दरम्यान, सोन्या-चांदीची दुकाने मागील चौदा दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना सोने खरेदीचा पर्यायच उरलेला नाही. सध्या लग्नाचे फारसे मुहूर्त नसले तरी पुढील महिन्यात काही मुहूर्त आहेत. तसेच २५ दिवसांवर गुढीपाडव्याचा सणही आला आहे. मुलांचे वाढदिवस, मुंज, स्वागत समारंभ, तसेच विविध घरगुती कार्यक्रमांची रेलचेल सतत सुरूच असते. त्यासाठी सोन्या-चांदीचे दागिने करण्याची लगबग असते. पण ही लगबग सध्या थंडावली आहे. दुकाने बंद असल्याने नागरिकांच्या हौसेवरही पाणी पडले आहे. सोने खरेदीचा आॅनलाईन पर्याय असला तरी विश्वासार्हतेअभावी त्याकडे लोकांनी दुर्लक्ष केले आहे. सध्या सराफांचा बंद मिटण्याची चिन्हे दिसत नसल्याने नागरिक विशेषत: महिला बाजारपेठ पुन्हा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहात आहेत.मंगळवारी ठरणार दिशामहाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनने पुण्यात काढलेल्या महामोर्चानंतर अध्यक्ष अॅड. फत्तेचंद रांका यांनी केंद्र सरकारला १६ मार्चपर्यंत अबकारी कराबाबत निर्णय घेण्याचे आवाहन केले होते. कर रद्द न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. याविषयी बोलताना अॅड. रांका म्हणाले, सोमवारी संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहे. त्यानुसार आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय मंगळवारी सकाळपर्यंत घेतला जाईल.
सराफांच्या बंदमुळे १४०० कोटींची उलाढाल ठप्प
By admin | Published: March 15, 2016 4:19 AM