लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बसस्टॉप, भाजी मंडई अशा गर्दीच्या ठिकाणाहून दररोज असंख्य मोबाईल चोरीला जातात. प्रत्यक्षात हे मोबाईल चोरीला गेलेले आहेत, तरी त्याची नोंद पोलीस गहाळ झाले म्हणून ऑनलाईन तक्रार करायला सांगतात. असे सुमारे १४०० मोबाईलचा शोध घेतला जात असून त्यापैकी ७४ मोबाईल हस्तगत करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट २ ला यश आले आहे. त्यातील अनेक मोबाईल पुणे शहरात ॲक्टिव्ह असल्याचे आढळून आले आहे.
पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मिसिंग मोबाईलचा शोध घेण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली. पोलीस अंमलदार समीर पटेल यांनी परिमंडळ २ मधील सर्व पोलीस ठाण्यातील मिसींग तक्रारींचा आढावा घेतला. त्यांची माहिती प्राप्त करुन तांत्रिक विश्लेषण केले. त्यात १३ लाख ४३ हजार ७०० रुपयांचे महागडे ७४ मोबाईल शोधण्यात यश मिळाले.
पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे, सहायक निरीक्षक वैशाली मोरे, सहायक फाैजदार यशवंत आंब्रे, अस्लम शेख, चेतन मोरे, चंद्रकात महाजन, उत्तम तारु, निखील जाधव, समीर पटेल, गजानन सोनुने, मितेश चोरमोले, कादीर शेख, गोपाळ मदने, अजित फरांदे, अरुणा शिंदे यांनी ही कामगिरी केली.
चोरीचे मोबाईल परराज्यात विकणारी साखळी
पुण्यात चोरीला गेलेले, हरविलेले मोबाईल परराज्यात विकले जात असल्याचे पोलिसांच्या या शोध मोहीमेत आढळून आले. पोलिसांना मिळालेल्या या ७४ मोबाईलपैकी बहुतांश मोबाईल हे पुणे शहरात कार्यरत होते. पोलिसांनी त्यांना विचारल्यावर अनेकांनी ते आपल्याला सापडल्याचे सांगितले. प्रत्यक्षात त्यांनी ते कमी किमंतीत विकत घेतलेले होते. त्यांच्याकडे त्याची कोणतीही पावती नव्हती. तसेच बाहेरगावी ॲक्टिव्ह असलेल्या मोबाईलधारकांनी आम्ही विकत घेतल्याचे सांगितले. तेव्हा पोलिसांनी त्यांना गुन्ह्याचा धाक दाखविल्यावर काहींनी ते कुरियर करुन पोलिसांना पाठिवले आहेत.
याबाबत पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी सांगितले की, परिमंडळ २ मधील सर्व पोलीस ठाणे आणि जवळच्या परिमंडळ ३ मधील काही पोलीस ठाण्यातील गहाळ मोबाईलचा आढावा घेतला. त्यापैकी महागड्या सुमारे साडेपाचशे मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केल्यावर संबंधितांशी संपर्क करुन ७४ मोबाईल हस्तगत करण्यात यश आले आहेत. जवळपास ८० मोबाईल हे परराज्यात ॲक्टिव्ह असल्याचे या मोहिमेत आढळून आले आहे.
-----------------------
१४०० मोबाईलचा शोध सुरु
जानेवारी २०२१ पासून परिमंडळ २ मधील ७०० आणि परिमंडळ ३ मधील ७०० अशा सुमारे १४०० गहाळ म्हणून नोंद करण्यात आलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात येत आहे. त्यापैकी सुमारे साडेपाचशे मोबाईल ट्रेसिंगमधून आतापर्यंत ७४ मोबाईल हस्तगत करण्यात यश आले आहे. अन्य मोबाईलचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
- महेंद्र जगताप, पोलीस निरीक्षक
.......
ऑनलाइन तक्रारींची दखल घ्यावी
एखाद्याने तुम्हाला धाक दाखवून खिशातील २०० रुपये काढून घेतले तरी पोलीस त्याची दखल घेतात. पोलीस अधिकारी घटनास्थळी भेट देतात. गुन्हा दाखल होतो. पण तुमचा २० हजारांचा मोबाईल चोरीला गेला असला तरी पोलीस लॉस्ट ॲन्ड फाऊंडला तक्रार करायला सांगतात. नागरिकांनाही मोबाईल परत मिळण्याची शक्यता वाटत नाही. त्यामुळे तेच सीमकार्ड मिळण्यासाठी ते ऑनलाईन तक्रार करतात. ऑनलाईन तक्रारीची दखल घेत नसल्याने अशा चोरट्यांचे फावले आहे.