बारामती : बऱ्हाणपूर येथे होत असलेल्या पोलीस उपमुख्यालयाला राज्य शासनाच्या वतीने १४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यानिमित्ताने बऱ्हाणपूरसारख्या जिरायतीभागाचा विकास होण्यास मदत होणार आहे. तसेच हे पोलीस उपमुख्यालय बारामतीच्या शिरपेचातील मानाचा तुरा ठरणार आहे.
पोलीस उपमुख्यालयाची ही इमारत परिपूर्ण बनवण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून राज्याच्या गृह विभागाने ५ मार्च रोजी २२० कोटी रुपयांच्या नियोजित उपविभागाच्या उपमुख्यालयाच्या आराखड्यात १४२.६२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामध्ये प्रशासकीय इमारती व सेवा निवासस्थाने यांचे बांधकाम केले जाणार आहे. याचे अंदाजपत्रक मंत्रालयाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तपासल्यानंतर, त्यास १४२.६२ कोटी रुपये सुधारित करून प्रशासकीय सहमती प्रशासकीय मान्यता देण्यास संमती दिली. बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालयाच्या आराखड्याला राज्याच्या गृहमंत्रालयाने २८ आॅगस्ट २०२० रोजी मंजुरी दिली होती. त्यानंतर ५ मार्च २०२१ रोजी राज्याच्या गृहमंत्रालयाने उपमुख्यालयाच्या प्रशासकीय इमारत व निवास्थांनाच्या उभारणीसाठी लागणाºया १४२.६२ कोटीच्या निधी मंजूरी दिली असल्याने उपमुख्यालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. ५० एकरांवर हे उपमुख्यालय उभारण्यात येणार आहे. पोलीस उपमुख्यालयाच्या आराखड्याला राज्याच्या गृहमंत्रालयाने २८ आॅगस्ट २०२० रोजी मंजुरी दिली होती. त्यानंतर लगेच मूलभूत सुविधासाठी २ कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या उपमुख्यालयाच्या निमित्ताने बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. अप्पर पोलीस अधीक्षकांच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस मुख्यालयातून बारामती येथील पोलीस बंदोबस्त येईपर्यंत तेथील परिस्थिती आटोक्यात आणणे अत्यंत अडचणीचे होत असते. या उपमुख्यालयामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण राखणे व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून बºहाणपूर येथे पोलीस उपमुख्यालय कार्यरत होणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील आठ उपविभाग व त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या २८ पोलीस ठाण्याचा समावेश होणार आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र, मुख्यालयापासूनचे अंतर, पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये लोकसंख्येमध्ये व गुन्ह्याच्या संख्येमध्ये झालेली लक्षणीय वाढ, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस मुख्यालयातून बारामती येथील पोलीस बंदोबस्त येईपर्यंत तीन ते साडेतीन तासांचा कालावधी जातो. त्यामुळे स्थानिक पोलिसांना अपुरे मनुष्यबळाअभावी तेथील परिस्थिती आटोक्यात आणणे अत्यंत अडचणीचे होते. जिल्ह्याच्या आस्थापनेवर एकच पोलीस मुख्यालय कार्यरत आहे. त्यामुळे बºहाणपुर येथे पोलीस उपमुख्यालय स्थापन करणेबाबतचा प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयाने सादर केला होता. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मौजे बऱ्हाणपूर, तालुका-बारामती, जिल्हा-पुणे येथे पोलीस उपमुख्यालय निर्माण करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता मिळाली आहे.
पोलीस प्रशासनाच्या दृष्टीने बऱ्हाणपूर येथे होणारे पोलीस उपमुख्यालय गरजेचे होते. त्या अनुषंगाने सात महिन्यांपूर्वी प्रस्तावास मंजुरी मिळाली होती. आता मुख्य प्रशासकीय इमारतीस व निवासस्थानांसाठी निधी उपलब्ध झाल्याने येथील पोलीस उपमुख्यालयाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
- नारायण शिरगावकर
उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती
--------------------------------