लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गरीब व सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देण्यासाठी शासनाने गतवर्षी कोरोना रुग्णांना महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतून लाभ देण्याचा निर्णय घेतला. यासाठी शंभर टक्के कोविड रुग्णालयांना या योजनेत समाविष्ट करून घेतले. जिल्ह्यात ७८ खासगी आणि सरकारी रुग्णालयांत या योजनेअंतर्गत उपचार दिले जातात. यातील ४८ रुग्णालये कोविडसाठी तर, ३४ कोविडविना उपचारांसाठीची रुग्णालये आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील ६५ हजार ३८५ रुग्णांना १४३ कोटी ५८ लाख ७३ हजार ५६८ रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष डाॅ. राजेश देशमुख यांनी रुग्णालयनिहाय माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांतच शासनाने सर्व पात्र कोरोना रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत लाभ देण्याचा निर्णय घेतला. या योजनेअंतर्गत केवळ दीड लाखापर्यंतच मदत करता येत असल्याने शासनाने याचसोबत आयुष्मान भारत योजनेतूनदेखील मदत देण्याचा निर्णय घेतला. राज्यातील सर्व रेशनकार्डधारक व देशातील आयुष्मान कार्डधारकांना हा लाभ घेता येतो. आयुष्मान भारत योजनेतून पाच लाखांपर्यंत मदत देता येते.
पुणे जिल्ह्यात एकूण ७८ रुग्णालयांचा या दोन्ही योजनांचा समावेश असून, यात ६२ खासगी तर १६ रुग्णालये ही शासनाची आहेत. यात पिंपरी-चिंचवड महापालिकेत योजनेअंतर्गत ८ रुग्णालये ग्रामीण भागातील ५० रुग्णालये तर, पुणे शहरातील २० रुग्णालयांचा समावेश आहे.
चौकट
कोरोनाच्या २० हजार ६४४ रुग्णांना लाभ
महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेत २० हजार ६४४ कोविड रुग्णांवर उपचार झाले. त्यांच्यासाठी ४३ कोटी १७ लाख ९१ हजार ५०० रुपये केंद्र आणि राज्य सरकारने खर्च केले. यातल्या सुमारे ३२ कोटी ६२ लाख रुपयांच्या रकमेचे दावे रुग्णालयास अदा करण्यात आले आहेत.