पुणे : मागील काही दिवसांत उन्हाचा पारा वाढला असून, ताे कमी व्हायचे नाव घेत नाही. हा पारा सातत्याने वाढत असल्याने उष्माघाताच्या रुग्णांची संख्यादेखील वाढू लागली आहे. राज्यात आतापर्यंत १८४ रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी १४३ रुग्ण गेल्या २२ दिवसांतील आहेत. पुण्यातही उष्माघाताच्या रुग्णांची संख्या सहावर पाेहाेचली आहे. सुदैवाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. परंतु, संभाव्य धाेका विचारात घेऊन काळजी घेण्याचे आवाहन आराेग्य विभागाने केले आहे.
याआधी १ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ४१ हाेती. आता २६ एप्रिलपर्यंत ही रुग्णसंख्या १४३ ने वाढून १८४ वर गेली आहे. यापैकी सर्वाधिक २० रुग्ण धुळे जिल्ह्यात आढळले आहेत. त्या खालाेखाल ठाणे - १९, नाशिक - १७, वर्धा - १६, बुलढाणा - १५; तर सातारा येथे १४ रुग्णांची नाेंद झाली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये ही संख्या १३ च्या खालाेखाल आहे. या आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा रुग्णालयांत ठेवण्यास आराेग्य विभागाकडूनही सांगण्यात आले आहे.
उन्हाचा धाेका काय?
डोकेदुखी, त्वचा कोरडी पडणे, लघवी कमी प्रमाणात येणे, पिवळी लघवी येणे, शरीरावर लाल चट्टे उठणे, हात, पाय आणि टाचांना सूज येणे, स्नायू दुखणे, चक्कर येणे, डोळ्यांची आग होणे या प्रकारचा त्रास उन्हामुळे हाेताे.
राज्यात १ मार्चपासून उष्माघाताच्या रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. आतापर्यंत १८४ रुग्णांची नोंद झाली असून, एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. उष्माघाताचे रुग्ण वाढू लागल्याने सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि महापालिकांचे वैद्यकीय अधिकारी यांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी उन्हाबाबत काळजी घ्यावी. - डॉ. राधाकिशन पवार, सहसंचालक, आराेग्य विभाग