पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेवर एकूण एक हजार ४३० हरकती-सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यातील तब्बल एक हजार ३०० हरकती-सूचना प्रभाग क्रमांक एकच्या रचनेवर घेण्यात आल्या आहेत. या हरकतींवर ३ व ४ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार असून, या निवडणुकीसाठी ७ आॅक्टोबरला आरक्षण सोडत काढण्यात आली. याच दिवशी प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर निवडणूक विभागामार्फत १० ते २५ आॅक्टोबर या कालावधीत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार मंगळवारी हरकती व सूचना सादर करण्याचा अखेरचा दिवस होता. विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेवर एकूण एक हजार ४३० हरकती, सूचना नोंदविल्या आहेत. दरम्यान, त्यातील १३०० हरकती या केवळ प्रभाग क्रमांक १ च्या रचनेवर घेण्यात आल्या आहेत. तळवडेचा परिसर चिखली गावठाण भागाचा समावेश असलेल्या प्रभागाला जोडण्यास येथील नागरिकांनी हरकत घेतली आहे. उर्वरित हरकती इतर प्रभागांसाठी आहेत. दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभागांना नावे देण्यात आलेली नाहीत. हे प्रभाग केवळ क्रमांकाने ओळखले जाणार आहेत. परंतु, प्रभागांना नाव न देण्याच्या मुद्द्याबाबत एकाही नागरिकाने हरकत घेतलेली नाही. या हरकतींवर ३ व ४ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)यंदाच्या महापालिका निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग असल्याने प्रभागाचा विस्तारही वाढला आहे. मात्र, अगोदरपासूनच तयारी केलेल्या काही इच्छुकांचे मात्र या प्रारूप प्रभागरचनेमुळे नियोजन बिघडले आहे. अमुक भाग आपल्याकडे येईल, या अंदाजाने अनेक इच्छुकांनी तयारीही केली होती. त्या भागांमध्ये कामेही केली होती. मात्र, संबंधित भागच प्रभागरचनेत नसल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. दरम्यान, मोठ्या प्रमाणात हरकती, सूचना नोंदविण्यात आल्या आहेत. या हरकती, सुचनांवर सुनावणी झाल्यानंतर अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात येणार आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या विशेष मतदारनोंदणी मोहिमेची मुदत २१ आॅक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली होती. यामध्ये एक लाख ३० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त व्हावा, यासाठी ही मोहीम राबविण्यात आली.
प्रभागरचनेवर १४३० हरकती
By admin | Published: October 26, 2016 5:53 AM